पुणे:
एल्सेव्हियर या डच प्रकाशन कंपनीच्या सहकार्याने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत “अॅक्सेसिबल सायन्स: फोस्टरिंग कोलॅबोरेशन” या विषयावर आज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . पुण्यात होणाऱ्या आगामी चौथ्या जी 20 शिक्षण कार्यगट आणि शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आयोजित विविध कार्यक्रमांची सुरुवात या चर्चासत्राने झाली.
या चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती , पुण्याच्या आयआयएसईआरचे संचालक सुनील एस भागवत, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एसटीएम पब्लिशर्सचे अध्यक्ष आणि एल्सेव्हियरचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. निक फॉलर , रिसर्च नेटवर्क्स, एल्सेव्हियरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रोफेसर एमेरिटस, कॅम्पिनास, युनिकॅम्प, ब्राझीलचे कार्लोस हेनरिक डी ब्रिटो क्रूझ आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी जागतिक विकासासाठी सुगम्य विज्ञानासाठी सर्वोत्तम पद्धतींवर सकारात्मक चर्चा केली आणि जी -20 देशांना पुढील वाटचालीसाठी एक सुस्पष्ट दृष्टिकोन दिला.
शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी यावेळी “जी 20 राष्ट्रांच्या अनुषंगाने विकासासाठी संशोधन सहकार्याची स्थिती आणि प्रासंगिकता” या शीर्षकाचा अहवालही प्रकाशित केला.
उद्घाटन सत्रात बोलताना डॉ.सुभाष सरकार यांनी ज्ञानवर्धनातील अडथळे दूर करणे, पारदर्शकतेला चालना देणे आणि बहुविद्याशाखीय सहकार्यांना चालना देण्याच्या महत्वावर भर दिला. शिक्षण राज्यमंत्र्यांनी सरकारच्या लस मैत्री, जीनोम इंडिया प्रकल्प, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे भुवन, ई-शोधगंगा, स्वयंम आणि स्वयंम-एनपीटीईएल मंच या, सार्थ बदल आणि शाश्वत विकासाला कारणीभूत असलेल्या यशस्वी सहयोगी प्रयत्नांच्या उदाहरणांसह अनेक ‘सुलभ विज्ञान’ उपक्रमांचा उल्लेख केला. गणिता आणि ज्यामिती (भारतीय गणित आणि भूमिती प्रणाली) आणि वास्तुविद्या (भारतीय वास्तुकला प्रणाली) यासह भारतीय ज्ञान प्रणालीच्या बहुआयामी पैलूंचा शोध घेण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या संभाव्यतेवरही त्यांनी जोर दिला.
एल्सेव्हियरचे मुख्य शैक्षणिक अधिकारी निक फॉलर यांनी यावेळी बोलताना वैज्ञानिक संशोधनातील भारताची उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय यशाचा उल्लेख केला. भारताची विद्वत्तापूर्ण फलनिष्पत्ती सातत्याने वाढत आहे. 2022 मध्ये यूकेला मागे टाकत भारत वैज्ञानिक संशोधनाचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे, असे त्यांनी नमूद केले. मात्र भारताने केवळ संशोधानाच्या प्रमाणातच यश मिळवलेले नाही, तर शैक्षणिक गुणवत्तेतही यश मिळवले आहे.फील्ड वेटेड सायटेशन प्रभाव 2019 मधील 0.85 वरून 2021 मध्ये 1.05 पर्यंत वाढवत प्रकाशनातही भारताला जागतिक सरासरीपेक्षा पुढे ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. निक यांनी जागतिक संशोधन आणि नवोन्मेषात देशाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी गुणात्मक संशोधन करण्यासंदर्भातील भारत सरकारने लक्ष केंद्रित केल्याबद्दल प्रशंसा केली. परिणामी भारत जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर पोहोचला, असे ते म्हणाले.
एल्सेव्हियरचे वरिष्ठ उपाध्यक्ष कार्लोस हेनरिक डी ब्रिटो
क्रूझ यांनी अहवालातील ठळक मुद्दे देखील सादर केले. जागतिक वैज्ञानिक समुदायात भारताची प्रगती त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी त्यांच्या सादरीकरणात नमूद केले आहे की भारत कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित विषयांमध्ये भारत जगातील दुसरा सर्वातमोठा प्रकाशक ठरणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी लिहिलेला सर्वात जुना लेख भारतीय लेखकाचा ऑगस्ट 1968 प्रकाशित झाला असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणात नमूद केले.
भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती यांनी, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयआयएसईआर, पुणे आणि एल्सेव्हियरचे आभार मानले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये संशोधन परिणामात सुधारणा करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील संस्थांपर्यंत पोहोचण्याविषयी तरतूद करण्यात आली असल्याचे के. संजय मूर्ती यांनी यावेळी सांगितले. आज सुरू झालेल्या चर्चेतून आणि सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे जागतिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी संशोधन सहयोग आणि योग्य नियामक आराखडा तयार करण्याचे नवे मार्ग आणि ज्ञान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हा परिसंवाद महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचा भाग आहे. हा परिसंवाद 19 ते 21 जून 2023 या कालावधीत होणार आहे. “विशेषत्वाने मिश्रित शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे” ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. शिक्षण कार्यगटाच्या बैठकीत विविध पूर्ववर्ती कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, वारसा स्थळांच्या सहलींचा समावेश आहे.

