पुणे -शहरातील सर्व नागरिकांसाठी पुणे महापालिकेकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना . या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विनोद नाईक यांनी केले आहे.
शहरी गरीब वैद्यकीय योजनेंतर्गत पॅनेलवरील खासगी हॉस्पिटलमधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने 50 टक्के किंवा 100 टक्के हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करता येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च रुग्णांनी भरणे आवश्यक आहे.
सभासदत्व घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1. एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला.
2. पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
3. झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे नोंद असलेली पावती
4. अपत्यांचे आधार कार्ड (25 वर्षा खालील)
5. कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधार कार्ड (मनपा कार्यक्षेत्रातील)
6. पात्र सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
7. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण 200 रुपये (सभासद नोंदणी शुल्क रु.100 आणि वार्षिक शुल्क रु.100) शुल्क आकारले जाते.

