मुंबई, १६ जून २०२३: हिंदुजा कुटुंबाचे पूज्य पितामह आणि हिंदुजा समूहाचे माजी अध्यक्ष, दिवंगत श्रीचंद पी हिंदुजा, यांना मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राजकीय मान्यवर, उद्योगपती, हितचिंतक, परदेशी सल्लागार आणि आध्यात्मिक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. १०८ वर्षांच्या हिंदुजा समूहाच्या अध्यक्षपदी असताना श्री. एस. पी. हिंदुजा हे परोपकारासाठी समर्पित होते, समूहाच्या मूल्यांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले अशा त्यांच्या स्मृती यावेळी जागवल्या गेल्या. विविध स्तरांमधून २५०० हुन अधिक व्यक्ती या प्रार्थना सभेला उपस्थित होत्या.
हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी आपले प्रिय दिवंगत बंधू श्रीचंद हे कुटुंब व मित्रपरिवाराचे मित्र, मार्गदर्शक व गुरु होते असे सांगितले. श्री. जी पी हिंदुजा म्हणाले, “आम्हा भावंडांसाठी ते आमच्या विश्वाचा केंद्रबिंदू होते. एकमेकांसोबत शांततेत व समन्वयाने राहण्याचा, आमच्या कुटुंबाची तत्त्वे व मूल्ये यांचे पालन करण्याचा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला. व्यक्तिशः माझ्यासाठी त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते लहानपणापासून माझे मार्गदर्शक होते आणि मी त्यांचेच बोट धरून मोठा झालो. लहान वयापासूनच मला त्यांचा खूप लळा होता. आम्ही सतत एकत्र असायचो. लोक अनेकदा आम्हाला राम-लक्ष्मणाची जोडी म्हणत. आमच्यात प्रकाश म्हणजे भरत आणि अशोक शत्रुघ्न…. मायदेश आणि इतर देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी श्रीचंद यांनी अथक प्रयत्न केले. ते पडद्याआडून, प्रसिध्दीझोतापासून दूर राहून काम करणारे असे भारताचे खूप महान राजदूत होते. जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी आम्हा भावांना सोबत घेऊन खूप मेहनत केली. प्रिय एसपी आम्ही तुम्हाला वचन देतो की पिढ्यांपिढ्यांपासून चालत आलेला हा प्रवास आपला परिवार पुढे अखंड चालू ठेवेल. दादा व अम्मांकडून तुम्हाला वारसा म्हणून जी तत्त्वे व मूल्ये मिळाली व जी आमच्या भविष्यातील एकजुटता व कल्याणासाठी आमच्याकडे सुपूर्द केलीत त्यांचे पालन आम्ही सतत करत राहू.”
श्री. नितीन गडकरी, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे माननीय केंद्रीय मंत्री यांनी दिल्लीहून पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले, “श्रीचंद हिंदुजा यांनी फक्त संपत्तीच निर्माण केली नाही तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील केली. ४८ देशांमध्ये त्यांनी नोकऱ्यांच्या २००००० संधी निर्माण केल्या. या उद्योगसमूहासोबत भारत सरकारचे संबंध खूप चांगले आहेत. नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्यकाळात या समूहाने देशाला विशेष साहाय्य पुरवले.”
इस्कॉनचे माननीय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, ऋषिकेशच्या परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, बीएपीएस स्वामीनारायणचे पूज्य स्वामी ब्रह्मविहारी आणि इशा फाऊंडेशनचे सद्गुरू या प्रमुख आध्यात्मिक गुरूंनी दिवंगत एस पी हिंदुजा यांना श्रद्धांजली वाहिली.
इस्कॉनचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु माननीय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांनी सांगितले की एक मजबूत पारिवारिक पुरुष म्हणून एस पी हिंदुजा यांचे विचार अतिशय ठाम होते. ते म्हणाले, “एकजुटता व प्रगती यांचे सच्चे पुरस्कर्ते एस पी हिंदुजा यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यांची अफाट उदारता आणि सामाजिक कारणांप्रती समर्पण यांचा जागतिक स्तरावरील समुदायांवर परिवर्तनात्मक प्रभाव पडला आहे. त्यांचे परोपकारी कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनचे अध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद सरस्वती यांनी श्री एस पी हिंदुजा यांच्या पूज्य स्मृतींना उजाळा देताना सांगितले, “द्रष्टे नेते आणि परोपकारी व्यक्ती म्हणून एस पी हिंदुजा यांनी एक महान वारसा निर्माण केला आहे. त्यांच्या महान योगदानामुळे असंख्य जीवनांमध्ये प्रकाश आला आहे. त्यांची उणीव सतत भासत राहील.”
बीएपीएस स्वामीनारायणचे पूज्य ब्रह्मविहारी यांनी सांगितले की,श्रीचंद हिंदुजा यांचे मन विशाल होते…परोपकार हा त्यांच्या जीवनाचा एक भाग होता.”
कैलाश खेर, अनुप जलोटा आणि राहत फतेह अली खान या दिग्गज गायकांनी आपल्या भक्तिमय गाण्यांमधून दिवंगत एस पी हिंदुजा यांना आदरांजली वाहिली.
श्री अशोक हिंदुजा यांच्या पत्नी श्रीमती हर्षा हिंदुजा यांनी सांगितले की दिवंगत एस पी हिंदुजा यांनी त्यांच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केले. हिंदुजा कुटुंबातील तिसरी पिढी संजय हिंदुजा, अजय हिंदुजा, धीरज हिंदुजा आणि शोम हिंदुजा यांनी सांगितले की ते दिवंगत एस पी हिंदुजा यांचा महान वारसा पुढे जपत राहतील.
हिंदुजा कुटुंबाला जगभरातील मान्यवर व्यक्तींकडून शोकपत्रे आणि संदेश प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये प्रख्यात राजपरिवार, राष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यात्मिक आणि व्यावसायिक नेते, प्रसिद्ध कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि प्रेमळ सहकारी आहेत. सर्वांनी मनापासून सहानुभूती व्यक्त केली आहे व सांगितले आहे की दिवंगत एस. पी. हिंदुजा यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा गहिरा परिणाम सदैव जाणवत राहील.

