पुणे-
पुण्यात पुढील आठवड्यात होत असलेल्या जी 20 परिषद शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेकविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . त्या अंतर्गत गणेशखिंड इथल्या केंद्रीय विद्यालयात आज पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती आणि त्यासाठीची शैक्षणिक साधने याविषयी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . पुणे महापालिकेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाचे उपायुक्त राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले . 3 ते 9 वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया जेवढा मजबूत होईल तेवढी त्यावरील इमारत म्हणजे देशाचे भविष्य उज्वल होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . मुलांच्या जडण घडणीत पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच सहभाग शिक्षकांचा देखील असतो याची जाणीव प्रत्येक शिक्षकाने ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले .


दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विविध सत्रामधून तज्ज्ञांनी पायाभूत शिक्षण पद्धती नेमकी कशी असावी . त्यासाठी वापरले जाणारे अभिनव साहित्य याविषयी मार्गदर्शन केले.

पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातील केंद्रीय प्रशालेच्या प्राचार्य संगीता गुटेन यांनी निपुण भारत अभियाांतर्गत पायाभूत साक्षरतेच्या विविध शिक्षण प्रणालीविषयी माहिती दिली . गणेशखिंड केंद्रीय विद्यालय मधील प्रा . सुरेखा नरके , खडकी केंद्रीय विद्यालय चे प्रा. प्रबिर नाग यांनीही संख्याशास्त्र विषयी मार्गदर्शन केले . केंद्रीय विद्यालयांच्या मुंबई विभागाच्या उपायुक्त सोना सेठ यांचेही यावेळी भाषण झाले .पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवताना केंद्रीय विद्यालयातील प्राध्यापकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . उपस्थित पालकांनी देखील या कार्यशाळेत मोलाचा सहभाग घेतला .
पुण्यातील विविध केंद्रीय विद्यालयातील शिक्षक , प्राचार्य आणि पालक या कार्यशाळेला उपस्थित होते . याशिवाय विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पायाभूत शिक्षणासाठी आवश्यक विविध साधने तयार केली असून त्यांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरवण्यात आले होते . केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले होते .

