पुणे, दि. १५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची/ मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी दिवे (ता. पुरंदर), तरंगवाडी (ता. इंदापूर), पेठ (ता. आंबेगाव) अशा तीन तर मुलींसाठी चांडोली (ता. खेड) या ठिकाणी शासकीय निवासी शाळा असून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दौंड येथेही मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येत आहे.
या निवासी शाळेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के तर दिव्यांगासाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असेही कळविण्यात आले आहे.
0000

