पुणे, ता. १२ : गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज पडण्याच्या भयावह घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना जीवाला मुकावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत राज्य सरकारने गंभीरतेने लक्ष द्यावे, याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी आज मुख्यमंत्री, नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पुणे – अहमदनगर, पुणे – नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गांवर हे जाहिरातींचे होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात उभे राहिले असल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी आवश्यक नसल्याने असे होर्डिंग्ज महामार्गाच्या लगत, इमारतींच्या छतावर, फुटपाथवर, गावाजवळ अनधिकृतपणे अतिशय वेगाने लावण्यात येत आहेत. त्यासाठी कोणत्याही नियमांची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे यामध्ये उघडकीला येत आहे. या होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपन्या अत्यंत निष्काळजीपणे हे काम करीत असल्याचे निष्पन्न होत आहे.
पुणे नगर महामार्गावर वाघोली जकात नाका ते रांजणगाव दरम्यान दोन्ही बाजूने २६४, वाघोली ते लोणीकंद या सहा किलोमीटर अंतरावर १३१; पुणे नाशिक महामार्गावर मोशी ते चाकण दरम्यान ११४ होर्डिंग्ज उभारली गेली आहेत. यातील अनेक ठिकाणी फक्त सांगाडे उभे आहेत. मागच्या काही दिवसांत किवळे, हिंजवडी, पिंपरी येथे होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडल्या होत्या. मागच्या काही दिवसांत किवळे, हिंजवडी, पिंपरी येथे होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडल्या होत्या. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातही अशी घटना घडली होती.त्यावरही डॉ. गोर्हे यांनी निवेदन दिलेले होते. तसेच याबाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. अशाच प्रकारच्या घटना भविष्यातही इतर शहरांमध्येही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनचविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारकडे याबाबत लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

