पुणे-माहिती अधिकार अंर्तगत पुणे महानगरपालिकेत अनाधिकृत बांधकामांची माहिती विचारणाऱ्या उपनगर वार्ताहरावर रविवारी रात्री महर्षीनगर परिसरात माेटारसायकलवर आलेल्या दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची घटना घडली आहे.हर्षद कटारिया (वय-३४) असे या वार्ताहराचे नाव असून या घटनेत त्यास काेणतीही इजा झालेली नाही. याप्रकरणी स्वारगेट पाेलीस ठाण्यात दाेन अनाेळखी हल्लेखाेरां विराेधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली आहे.हर्षद कटारिया हे रिअल इस्टेट एजंट म्हणून प्रामुख्याने काम करीत आहे. त्यासाेबत बिबवेवाडी भागात एका दैनिकाचा उपनगर वार्ताहर म्हणून ते काम करीत आहेत.
१० ते १२ दिवसापूर्वीच हर्षद कटारिया यास तीनजणांनी अडवून त्यांच्या डाेळ्यात मिरची पावडर टाकून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला हाेता. माहिती अधिकार अंर्तगत त्याने पुणे महनगरपालिकेत सात ते आठ अर्ज दाखल केलेले असून नुकतीच त्याच्या एका अर्जाची दखल घेऊन बिबवेवाडी परिसरात एक अनाधिकृत इमारत जमीनदाेस्त करण्यात आलेली हाेती. रविवारी रात्री हर्षद कटारिया हे महर्षीनगर परिसरातून पुणे-सातारा रस्त्याने अतिथी हाॅटेल जवळून घरी जात हाेते. ते साेसायटीच्या गेटजवळ आले असताना त्यावेळी त्याच्या पाठलाग करत दुचाकीवरुन आलेल्या दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी त्याला अडवून त्याच्या डाेळयात मिरची पूड टाकून त्याच्यावर रिव्हाॅलवर राेखून त्याच्या दिशेने दाेन राऊंड फायर केले.परंतु, ते लगेचच वाकल्याने हल्लेखाेरांचा नेम चुकला व ते तातडीने पसार झाले. दरम्यान, याबाबतची तक्रार कटारिया यांनी पाेलिसांना दिली आहे. त्यानुसार दाेन अज्ञात हल्लेखाेरांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यांतर, ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली. त्यावेळी पाेलिसांना दाेन पुंगळ्या घटनास्थळी आढळून आल्या. तसेच जवळील परिसरात एका सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरुन पसार हाेणारे हल्लेखाेर कैद झाले असून त्याआधारे आराेपींचा शाेध घेण्यात येत आहे. नेमके काेणत्या कारणास्तव कटारिया याचेवर हल्ला करण्यात आला याबाबत खुलासा झालेला नाही. स्वारगेट पाेलीस या गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.

