वटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा अनोखा उपक्रम ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन
पुणे : वडाची पाने, पारंब्या, विविधरंगी फुलांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. वडाचे छोटे रोप मंदिराच्या सभामंडपात ठेवण्यात आले, तसेच पारंपरिक पद्धतीने वडाचे पूजन देखील झाले. केवळ झाडाचे पूजन न करता, वडाचे व वटपौर्णिमेचे महत्व हे शास्त्रीय मीमांसा या कार्यक्रमाद्वारे यावेळी उलगडण्यात आले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा या उपक्रमांतर्गत या सणाचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व भाविकांना सांगण्यासोबतच जनजागृतीपर फलक देखील लावण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या अॅड.ईशानी जोशी, भाग्यश्री मंठाळकर, डॉ.अंजली काळकर, ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार आदी उपस्थित होते. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बापूसाहेब कुतवळ, उज्वला कुतवळ, गौरव कुतवळ, प्रियांका कुतवळ, मीरा कुतवळ यांच्या हस्ते दत्तयाग झाला.
अॅड.ईशानी जोशी म्हणाल्या, सर्वात दाट सावली वडाची असते. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. त्यामुळे याविषयीची केवळ परंपरा व संस्कृती ही नव्या पिढीपर्यंत न पोहोचविता त्याबद्दलची शास्त्रीय मीमांसा देखील पोहोचणे गरजेचे आहे.
भाग्यश्री मंठाळकर म्हणाल्या, वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे.र्वाधिक आॅक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून वडाची ख्याती आहे. त्यामुळे वडाच्या वृक्षाचा सामाजिक संदर्भ देखील लोकांपर्यंत पोहोचायला हवा. मंदिरात एकत्र येऊन वडाचे पूजन व महत्व जाणून घेण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.
युवराज गाडवे म्हणाले, धार्मिक उपक्रमामागील प्राचीन काळापासून प्रगत शास्त्रीय मीमांसा भाविकांसमोर मांडण्याचा ट्रस्टचा उद्देश आहे. जेणेकरून नवीन पिढीला त्यामध्ये रूची वाढेल. डॉ.अंजली काळकर, अॅड.रजनी उकरंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
वडाची पाने व पारंब्यांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर
Date: