पुणे :स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पाच महिलांचा समावेश असून, पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत.
ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रायव्हेट रोड येथे आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या आणि ताटे फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ आणि भूषण भंडारी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरातील महिलांना मारहाण केली आणि अजय यांचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे भालशंकर यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली आणि रुपाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रसादाच्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्यांचा मित्र भूषण भंडारी यांना मारहाण केली, तसेच गीता घाटे यांनाही मारहाण झाल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करत आहेत.

