पुणे-भाजपात कौशल्य,अभ्यासू वृत्ती, सयंमी,वेळेला आक्रमक, सुस्थितील पण यशस्वी राजकीय खेळी करणारांना आणि पक्ष नेतृत्वाच्या सूचना तंतोतंत पाळणाऱ्यांना पुणे महापालिकेत गेल्या सत्रात पदे दिली गेलीत . आता प्रशासकीय राजवटी नंतर या निवडणुकीत महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. 165 जागांपैकी 119 जागेवर भाजपने विजय मिळवत महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे संपूर्ण बहुमत असणाऱ्या पुणे महापालिकेत महापौर कोण असणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौर पदासाठी आज मुंबईत आरक्षण सोडत जाहीर झाली. यात पुणे महानगर पालिकेसाठी खुल्या महिला गटासाठी महापौर पद आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याची नगरसेवक ही महिला असणार हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची स्थानिक नेते म्हणून आता महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकारी निवडण्यात आणि त्यासाठी फडणवीस यांची अनुमती मिळविण्यात कसोटी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी कुठे असतील हे आज तरी सांगता येणार नाही असे दिसते आहे.

ज्या पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याच पुण्याचा कारभार आता सावित्रीच्या लेकीच्या हाती असणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने 92 महिलांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पालिकेत लाडक्या बहिणीची चलती असणार हे निकालापूर्वीच स्पष्ट झालं होतं. निकालानंतर भाजपच्या जवळपास 50 पेक्षा जास्त महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकीच एक महिला आता महापौर असणार आहे.
यात प्रामुख्याने मंजुश्री खर्डेकर,वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे यांची नावं चर्चेत आहेत. मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या वर्षा तापकीर यांनी देखील विजयाची हॅट्रिक केलेली आहे.आमदार भीमराव तापकीरांनी यावेळी दक्षिण पुण्याला महापौर पद मिळेल असे निवडणुकी दरम्यान वक्तव्य केल्याचे अनेकांना आठवत असेलच. सिंहगड रस्त्यावरील मंजुषा नागपुरे गेल्या टर्म मध्ये महापौर पदासाठी इच्छुक होत्या.त्यांनी या महापालिका निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे .
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हाथ असतो असे म्हणतात ,पण मंजुश्री खर्डेकर यांच्या मागे त्यांचे पती संदीप खर्डेकर यांची दीर्घ तपस्या आहे आणि या दाम्पत्याने पक्षासाठी केलेल्या कामाची प्रत्यक्षात माहिती देवाभाऊ यांच्या पासून नितीन गडकरी अनेक राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनाही आहे. निष्ठेला महत्व , तळमळीचे कार्य अशा जमेच्या बाजू असलेल्या मंजुश्री खर्डेकर २ वेळा निवडून आल्यात ,तत्पूर्वी त्यांनी शिक्षण मंडळावर काम केले आहे. या दोघांनी कधीही स्वतःसाठी पक्षाकडे काही मागितले नाही आणि पदासाठी आक्रस्ताळेपणाही केला नाही . त्यामुळे यंदा मंजुश्री खर्डेकर आणि वर्षा तापकीर यांच्यात एक नाव निवडले जाईल असे अनेकांना वाटते आहे.
ही नावं जरी चर्चेत असली तरी भाजप ऐनवेळेला धक्कादायी राजकारणात अग्रेसर राहिलेले आहे. त्यामुळे ऐनवेळेस इतर दुसरे नाव सुद्धा समोर येऊ शकते.पण महापालिकेचा कारभार स्वयंभू पद्धतीने चालविता येईल काय ? असा ज्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित होतो अशा महिला नगरसेवकांची नावे चर्चेत काही न काही कारणाने पुढे येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने यंग ब्रिगेड कार्ड खेळेले होते त्याचा फायदा देखील भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता. हाच ट्रेंड जर भाजपने पुढे चालवला तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचं देखील नावं पुढे येऊ शकते असे काहींना वाटते पण अनुभव नसताना त्यांना लगेचच महापौरपद मिळेल का अशीही शंका व्यक्त होते तर आहेच .. इतकंच नाही तर पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात उच्चशिक्षित तरुण महिला म्हणून प्रथमच नगरसेविका झालेल्या निवेदिता एकबोटे या देखील शर्यतीत येऊ शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ आणि प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नावं केलं आहे. त्यामुळे पुण्याचो महापौर कोण असणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

