‘शब्द शिवसेनेचा’ वाचनानाम्याचे शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन
पुणे, दि.९: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात दाखल झाले. कात्रज तसेच संत कबीर चौक, कसबा पेठ येथे शिवसेना, रिपब्लिकन सेना आणि पतित पावन संघटनेच्या एकत्रित युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांना थेट इशारा देताना सांगितले की, “शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्हाला कमजोर समजू नका.
“यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहर प्रमुख नाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, अजय भोसले, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचा ‘शब्द शिवसेनेचा’ या वाचनानाम्याचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महापालिका निवडणुकीत शिवसेना एकटी लढत आहे. बाळासाहेबांचे वाघ डरपोक राजकारणाला घाबरत नाहीत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी ही शिवसेना नाही.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भर देताना सांगितले की, “मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली. अनेकांनी विरोध केला, कितीही प्रयत्न केले तरी ही योजना बंद होणार नाही.
घरांचा प्रॉपर्टी टॅक्स कमी करणार
नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या आतील प्रॉपर्टी टॅक्स रद्द करण्याचे आश्वासन दिले. कुणीतरी टॅक्स माफ करण्याची संकल्प करतात, पण आम्ही प्रत्यक्ष काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी विकासाच्या अजेंडावर जोर देत चांदणी चौकातील ट्रॅफिक जाम दूर केल्याचे उदाहरण दिले आणि कात्रज परिसरातील ट्रॅफिक समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच पुणे शहराचा नगरविकास, म्हाडा आणि इतर विभागांच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.
विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “कात्रजला सभा घेतली कारण विरोधकांना कात्रजचा घाट दाखवायचा आहे. शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली जी कधीही बंद होणार नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची आहे.” त्यांनी कात्रज आणि परिसरातील ड्रेनेज लाइनसाठी १५९ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली आणि मतदारांना धनुष्यबाण चिन्हावर मोठ्या मतांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
वाहतूक, पाणी, महिला सुरक्षा आणि सामाजिक योजनांना प्राधान्य; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे, पाणीपुरवठा, महिला सुरक्षा आणि सामाजिक योजनांना प्राधान्य देण्याचे आश्वासन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
याच पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पक्षांतील अनेक मान्यवर नेत्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यामध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर पक्षांचे नेते यांचा समावेश आहे.
प्रवेश केलेले प्रमुख नेते :
गायत्री भागवत, महाराष्ट्र प्रदेश सचिव, भाजप
अॅड. चित्रा जयवंत जानुगडे, अध्यक्ष, पुणे शहर/जिल्हा वकील आघाडी, रिपाई (अ. आठवले गट)
गिरीश घोरपडे, उपाध्यक्ष, पुणे शहर भाजप सहकार आघाडी; संचालक, नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, पुणे
नंदकुमार बोळे, चिटणीस, पुणे शहर भाजप सहकार आघाडी
प्रसाद राहुरकर, सदस्य, भाजप पुणे
शुभम जाधव, अध्यक्ष, GV ७ सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, पुणे

