पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा महापौर होईल, असेही ते म्हणाले. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे फारसे अस्तित्व राहणार नाही, असे मत त्यांनी मांडले.पुणे पत्रकार प्रतिष्ठानला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच, उपस्थित सर्वांशी संवाद साधला.यावेळी, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, ह. भ. प. पंकज महाराज गावडे, मंगेश काळे, उमेश शेळके, उमेश घोंगडे, प्रसाद कुलकर्णी, राजेंद्र पाटील, जितेंद्र अष्टेकर, सुनील भावे, योगेश बोरसे, गजेंद्र बडे, चंद्रकांत फुंदे, अरुण निगवेकर, अंजली खामितकर उपस्थित होते

महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप २९ महानगरपालिकांमध्ये एकत्रित निवडणूक लढवतील. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत येईल, तिथे एकत्रितपणे लढू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार वेगळे असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई होईल, असे संकेत त्यांनी दिले. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार आहे. महायुतीतील पक्षांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमधील पक्षांचे नेते एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत, असा कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांची केस जुनी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी या सरकारमध्ये कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुंढवा येथील जमीन प्रकरणात सरकार कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. आरोपी शीतल तेजवानी हिला १२ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासानंतर आणखी आरोपी निष्पन्न होतील आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
या प्रकरणात बुडवलेली स्टॅम्प ड्युटी संबंधित व्यक्तींना नियमानुसार जमा करावी लागेल. तहसीलदार सूर्यकांत येवले यांना केवळ निलंबित केले नसून, त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारी सेवक भ्रष्ट आढळल्यास आणि शासकीय जमीन दुसऱ्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्यांना सोडणार नाही, असेही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. राज्य सरकार पारदर्शकपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

