शून्य अपघाताचे ध्येय : अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वीज कर्मचाऱ्यांसह संघटनांसमोर प्रात्यक्षिक
पुणे- वीज कर्मचारी हा महावितरणचा आधारस्तंभ आहे. तो सुरक्षित असेल तरच अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या जिविताची सुरक्षा सर्वाधिक प्राधान्याचे आहे. व त्यासाठी महावितरण कंपनी अत्याधुनिक सुरक्षा साधने खरेदी करणार असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी पुणे येथे केले.
महावितरणच्या सांघिक कार्यालयातर्फे पुणे परिमंडल येथे १८ व १९ डिसेंबरला अत्याधुनिक सुरक्षा साधनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी कंपनीत कार्यरत असलेल्या प्रमुख औद्योगिक संघटनांच्या शिखर पदाधिकारी, व्यवस्थापनातील वरिष्ठ अभियंते व अधिकारी यांच्यापुढे रास्तापेठ उपकेंद्रात तर दुसऱ्या दिवशी (दि.१९) पद्मावती येथील २२/११ केव्ही उपकेंद्रात परिमंडलातील अभियंते व वीज कर्मचाऱ्यांपुढे सुरक्षा साधनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांचेसह वरिष्ठ अधिकारी व वीज कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार म्हणाले, ग्राहकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. वीजपुरवठा अखंडित देण्यासाठी यापुढे बिघाड होणार नाहीत, झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असेल, यावर काम करावे लागेल. बाजारात संभाव्य बिघाड ओळखण्याचे नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र बाजारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्री आपल्या यंत्रणेला पुरक आहे का? तसेच त्यात काय बदल करावे लागतील याची माहिती देण्यासाठी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायावर व साधनांच्या उपयोगितेवरच ही साधने खरेदी केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले, ‘आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना वेगवेगळ्या कसोट्या लावून वस्तूची निवड करतो. त्याप्रमाणे प्रत्येकाने सुरक्षा साधनांची उपयोगिता तपासून आपले प्रामाणिक मत नोंदवावे. कारण, ही साधने आपला जीव वाचविणारी आहेत. वापरकर्त्यांची खात्री पटल्याशिवाय व्यवस्थापन पुढे जाणार नाही.’ तर आभार प्रदर्शन करताना मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे म्हणाले, अपघात हा क्षणाचा असतो. परंतु, त्यामुळे कुटुंबाची घडी विस्कटते. कायमचे अपंगत्व येते. वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षेत तडजोड करु नये.’
सुरक्षा साधनांच्या प्रात्यक्षिकासाठी मे. तौरस पावरट्रॉनिक्स प्रा.लि.चे तर्फे अनुज अग्रवाल व त्यांच्या चमुने वीज पुरवठा चालू असताना बिघाड शोधण्यासाठी लागणाऱ्या विविध आधुनिक साधनांसह, फोल्डिंग शिडी, बहुउद्देशी रॉड आदींचे सादरीकरण केले. मे. टाटा कंपनीने २२ केव्ही पर्यंतचा वीज रोधक गम बूट सादर केला. याशिवाय महावितरणमधील गणेश वडते व मुबारक पठाण यांनी स्वत: विकसित केलेल्या ‘डिस्चार्ज रॉड’चे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी विशेष पुढाकार घेतला.


