पुणे, दि. १८: त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता गर्दी व्यवस्थापन व इतर सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्याबाबत नियोजन करावे, विकासकामे करतांना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन व इतर सोई-सुविधा), विकास आराखडाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीणचे उपधीक्षक दिलीप शिंदे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने, श्री क्षेत्र भीमाशंकरचे विश्वस्त यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महसूल, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, देवस्थानाचे पदाधिकारी आदींनी बैठक आयोजित करुन करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत माहिती देण्यात यावी. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजन व गर्दी व्यवस्थापनाबाबत नियोजनाबाबत माहिती द्यावी. देवस्थानाच्या सूचना विचारात घेवून कार्यवाही करावी. कामाकरिता लागणऱ्या आवश्यक त्या परवानग्या घेण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने नियंत्रण कक्ष उभारण्याबाबत कार्यवाही करावी.
श्री क्षेत्र भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांकरिता असलेल्या सर्व बाजूंचा विचार करुन रस्त्याचे सर्वेक्षण करुन करावयाच्या कामकाजाबाबत अदांजपत्रक तयार करावे. पाणी पुरवठा विभागाने भाविकांना पुरेशा पाणी उपलब्ध होईल, याकरिता नियोजन करावे. एसटीपी बाबत सुधारित आराखडा तयार करुन मान्यतेकरिता सादर करावा. निगडाळे येथील भाविक सुविधा केंद्र व वाहनतळाचे कामे करावीत. भाविकाच्या राहण्याच्यादृष्टीने टेंट सिटी उभारण्याबाबत वाहनतळाची जागा सोडून इतरत्र ठिकाणाचे सर्वेक्षण करावे. एकूणच श्री क्षेत्र भीमाशंकर येथील सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने करतांना भाविकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, असेही श्री.डुडी म्हणाले.
यावेळी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान स्थळ तुळापूर व समाधी स्थळ स्मारक वढू बु , मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांद शाहवली बाबा दरगाह, श्री क्षेत्र जेजूरी गड तिर्थक्षेत्र, राजमाता सईबाई स्मृतीस्थळ, सदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधी स्थळ विकास व सौंदर्यीकरण, कुरवंडे येथील टायगर व लायन्स पॉइंट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आराखडा, अष्टविनायक गणपती मंदीराचा जीर्णोध्दार करण्याबाबतची आढावा घेण्यात आला. भुसंपादनाची कामे प्रलंबित असल्यास गतीने पूर्ण करावीत. येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होतील याप्रकारे नियोजन करावे. कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीचाही विचार करावा. अतिक्रमण असल्यास तातडीने काढून घ्यावीत, सर्व संबंधित विभागाने समन्वयानी कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.
यावेळी सर्व संबंधित विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामकाज आणि नियोजनाच्याअनुषंगाने माहिती दिली.

