भोपाळ-जलतरणातील सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपेक्षा फर्नांडिस हिने आज सोनेरी षटकार पूर्ण करीत महाराष्ट्राची जलतरणामधील घोडदौड कायम राखली. पलक जोशीचे विजेतेपद तसेच रिले शर्यती मधील सुवर्णपदकासह महाराष्ट्राने आज सहा पदकांची कमाई केली.
मुलींच्या २०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यतीत मुंबईची खेळाडू अपेक्षा फर्नांडिसने येथे स्वतःचे चौथे सुवर्णपदक जिंकताना २ मिनिटे २४.९१ सेकंद वेळ नोंदविली. अंतिम शर्यतीसाठी ती सहाव्या लेन मधून पोहोत होती. अंतिम फेरीत तिच्यापुढे कर्नाटकच्या तीन खेळाडूंचे आव्हान असूनही तिने शेवटपर्यंत अप्रतिम कौशल्य विजेतेपद पटकावले. जागतिक कनिष्ठ गट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने आज पर्यंत राष्ट्रीय स्तरावर पदकांचा खजिनाच लुटला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. येथे याच शर्यतीत तिच्याबरोबर महाराष्ट्राची श्रृती स्वामी ही देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती, मात्र तिला पदकाने हुलकावणी दिली.

मुलींच्या दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या चार खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी मुंबईच्या पलक जोशी हिने ही शर्यत दोन मिनिटे २४.०२ सेकंदात पार करीत सोनेरी कामगिरी केली तर ठाण्याची खेळाडू प्रतिष्ठा डांगी हिने कांस्यपदक पटकावले. तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे १०.२८ सेकंद वेळ लागला. तीशा फर्नांडिस व राघवी रामानुजन यांना मात्र पदक मिळविता आले नाही.
प्रतिष्ठा डांगी, झारा जब्बार, अपेक्षा फर्नांडिस व अनन्या नायक यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. चुरशीने झालेल्या शर्यतीत त्यांनी चार मिनिटे ३०.४२ सेकंद वेळ नोंदवली. कर्नाटकच्या खेळाडूंनी महाराष्ट्राला शेवटपर्यंत झुंज दिली मात्र महाराष्ट्राची आघाडी तोडण्यात त्यांना यश मिळाले नाही.

मुलांच्या आठशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत वेदांत माधवन याचे सुवर्णपदक हुकले. त्याने हे अंतर आठ मिनिटे ३१.१२ सेकंदात पार केले आणि रूपेरी कामगिरी केली. गुजरातच्या देवांश परमार यांनी शेवटच्या दीडशे मीटर्स अंतरात त्याला मागे टाकले. दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने कांस्यपदक घेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने हे अंतर दोन मिनिटे १०.२८ सेकंदात पार केले.
खेळाडू व प्रशिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ- डॉ. दिवसे
आमच्या खेळाडूंनी खेलो इंडिया मध्ये जे काही यश मिळविले आहे. त्याचे बरेचसे श्रेय या खेळाडूंनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी जे अपार कष्ट घेतले आहेत त्याचेच हे द्योतक आहे. या खेळाडूंच्या तयारीसाठी आमच्या क्रीडा संचालनालया मधील सर्व संबंधित अधिकारी व अन्य वर्गानेही मदत केली आहे ते देखील कौतुकास पात्र आहेत अशा शब्दात राज्याचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

