नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
डी डी नॅशनल वाहिनी 11 फेब्रुवारीपासून वर ‘स्वराज’ ही लोकप्रिय मालिका दर शनिवार रविवारी दुपारी एक वाजल्यापासून बिंग वॉच मोड मध्ये म्हणजे एकापाठोपाठ एक एपिसोड्स स्वरूपात दाखवली जाणार आहे.
पंधराव्या शतकात, भारतात वास्को द गामाचे आगमन झाल्यापासूनचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवास्पद इतिहास रंजकपणे दाखवणारी “स्वराज- भारत की स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा” ही 75 भागांची मेगा मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात आली. या मालिकेत भारतीय इतिहासाचे अनेक आजवर न दाखवले गेलेले पैलू उजेडात आणण्यात आले असून, स्वातंत्र्यलढ्याच्या अज्ञात नायकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा दाखवण्यात आल्या आहेत.

पाच ऑगस्ट 2022 रोजी स्वराज ह्या मालिकेचा शुभारंभ, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, राज्यमंत्री डॉ. एल, मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. मालिकेचे प्रसारण 14 ऑगस्ट, 2022 पासून डीडी नॅशनल वर हिन्दी भाषेत आणि त्यानंतर नऊ प्रादेशिक भाषांत (तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी) प्रादेशिक वाहिन्यांवर दाखवण्यात आली. रविवारी सकाळी 9 वाजता आणि रात्री नऊ वाजता डीडी नॅशनल वर तिचे प्रसारण होत असे. तर पुनर्प्रसारण मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी एक वाजता तर शनिवारी रात्री 9 वाजता होत असे. तर याच मालिकची ध्वनिमुद्रित आवृत्ती आकाशवाणीवर, शनिवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जात असे.

