पुणे : नवीन भारतकेंद्रीत शैक्षणिक धोरणाचे कार्यान्वयन करण्यासाठी सिद्ध होण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे या चार संस्थांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देशपांडे बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस.के. जैन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव आणि संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. किशोर देसर्डा उपस्थित होते.
प्रा. देशपांडे पुढे म्हणाले की, विद्यापीठ ही एक लोकतांत्रिक रचना असून त्यातील विधायकता जपली गेली पाहिजे. या दृष्टीने अधिसभेची जबाबदारी मोठी आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये अत्यंत चांगले बदल होऊ घातले आहेत. हे बदल समाजात प्रसृत करण्यासाठी अधिसभा सदस्यांनी आपल्या कर्त्रुत्वाच्या वलयाचा वापर करावा. छात्रकेंद्री शिक्षण, स्त्रीकेंद्री परिवार, मनुष्यकेंद्री विकास आणि गरीबकेंद्री अर्थव्यवस्था अशी चतुःसुत्री डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडली होती, जी खरे तर या सहस्रकाची चतुःसुत्री आहे. याच आधारावर राष्ट्रीयतेचे भरणपोषण करणारे नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. सोनवणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “पहिली ते पीएच.डी. पर्यंतच्या शिक्षणाचे टप्पे श्रेयांकामध्ये मांडण्याचे महत्वपूर्ण काम देशाच्या इतिहासात प्रथमच झाले आहे. या परिस्थितीत अधिसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्या दृष्टीने विद्यापीठातील बदलांद्वारे समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करणे हे आता सर्वांचे दायित्व आहे.”
डॉ. शरद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये
नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना ‘नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जे बदल समाजात घडवून आणायचे आहेत, त्या बदलांची सुरुवात म्हणजे आजचा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन केले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त सदस्य श्री. रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्ष राबविण्याचे काम करताना निर्वाचित अधिसभा सदस्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. हे आव्हान सर्व सदस्य समर्थपणे पेलतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

