‘त्या बातम्या चुकीच्या -पेरलेल्या ‘
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले गेले. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक जण उष्माघाताने दगावले, अनेकांवर उपचार सुरू होते. मी त्या सर्वांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य आले, आदल्या दिवशीही अनेक जण आलेले आपल्याला दिसले असतील. यात आम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर 13-14 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा खर्च केला तर मंडप टाकायला काय अडचण होती? याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळीही घेता आला असता, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरीकडे, माझ्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र आहे, अशी जी चर्चा सुरू आहे त्याला काही अर्थ नाही. असं कोणतंही पत्र नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
त्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही…
अजित पवार पुढे असेही म्हणाले की, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचं दाखवत आहात, ते सर्व विविध कामांनिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. पक्षाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. आम्ही राज्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आहे. महागाई असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालय कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका.”
राष्ट्रवादीत राहणार हे अॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का?
अजित पवार पुढे म्हणाले की, बाबांनो काळी काळजी करू नका. शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढउतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाचे प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती होत नाही. खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
महाविकास आघाडीत आम्ही ठरवलं की, प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलतील. झालेल्या सभांमध्ये जे लोकं बोलले त्यांची बातमी नाही, आणि अजित पवार का बोलले नाहीत याची बातमी होते, हे बरोबर नाही. आमच्यात हे ठरलेलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीत राहणार हे अॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का? असा सवालही त्यांनी केला.
संजय राऊतांना लगावला टोला
महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोघे बोलणार आहेत. हे ठरवले आहे. मात्र, तरीही अजित पवार भाषण करणार नाहीत, अशा बातम्या दिल्या जात आहेत. हे चुकीचे आहे. बातम्यांचा विपर्यास सुरू आहे. माझ्या ट्विटर हँडलवर आहे तसे आहे. मी काय झेंडा सारखाच काय धरून ठेवू. काही झाले असेल, तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. कशाची गरज नाही.
कोणीतरी बातम्या पेरण्याचे काम आमच्याबद्दल विघ्नसंतोषी लोक करत असतील. काही काही बाहेरच्या पक्षाचे लोक एनसीपीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. आमचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये.
अजित पवार म्हणाले की, आता या गोष्टींना पूर्णविराम द्या. आम्ही सर्व परिवार म्हणून काम करत आहोत. जे काही संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. आमचीही सहनशीलता कधी-कधी संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका.
ते पुढे म्हणाले की, पवार साहेबांनी आज सकाळी मीडियाला जे काही सांगितलं ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. मी कुणाचीही सही घेतलेली नाही. जे काही करायचं ते पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेत असतो. घटनेने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येकाने आदर करावा. हे जे काही चाललं आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे.”दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनी 8 एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. तसेच, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदारही भाजपसोबत जाणार, असा दावा या वृत्तपत्राने केला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे, अशा चर्चांनाही ऊत आला होता. याबाबतही अजित पवारांनी खुलासा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

