पुणे : चैत्र वद्य त्रयोदशी म्हणजेच दिनांक २५ एप्रिल १८७३ रोजी सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात झालेल्या पाच हजार महिलांच्या हळदी-कुंकू समारंभाच्या आठवणींना उजाळा देत तब्बल १५० वर्षांनी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्या तिथीच्या दिवशी सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ पार पडला. पुणे सार्वजनिक सभेचे नेते गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ यांनी ‘स्त्री विचारवती सभा’ यांच्या पुढाकाराने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती करीत कार्यक्रमाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
इतिहास प्रेमी मंडळ व पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम शतकोत्तर सुवर्णमहोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शरद पंडित, सुप्रसाद पुराणिक आदी उपस्थित होते.
शेफाली वैद्य म्हणाल्या, हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांमध्ये संवाद होतो. महिला एकत्र येणे हे महत्वाचे आहे. हळदी-कुंकू समारंभाची परंपरा केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतभर आहे. सामाजिक उद्देशाने एखादी परंपरा पुढे नेणे, हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. तो पण जपायला हवा.
विद्याधर नारगोळकर म्हणाले, सार्वजनिक काकांनी स्वदेशी शपथ, इंग्रजी भाषेतील मासिक, दुष्काळात गरजूंना आर्थिक मदत अशी वैविध्यपूर्ण सामाजिक कामे केली. त्यात १५० वर्षांपूर्वी आयोजित केलेले सार्वजनिक हळदी-कुंकू हा वेगळा कार्यक्रम होता. नवा विष्णू मंदिर त्या घटनेचे साक्षीदार आहे.
मोहन शेटे म्हणाले, तब्बल १५० वर्षांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाची बातमी मुंबई च्या नेटिव्ह ओपिनियन मध्ये छापून आली होती. ही घटना त्या काळातील एक क्रांतिकारी व महाराष्ट्राला प्रागतिक घडवणारी घटना ठरली. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा त्याच नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता कामगार, भटके विमुक्त, देवदासी, तृतीयपंथी अशा समाजातील उपेक्षित महिलांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी महिलांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश घाटपांडे यांनी आभार मानले.

