शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा
मुंबई-राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.
काॅंग्रेस नेत्याशी बोलताना विधान
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत बोलताना ‘मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागेल’ असे विधान केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकासआघाडी टिकणार का? आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरस चर्चा रंगल्या. तर दुसरीकडे शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी अशा चर्चांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी आणि सत्ता
राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ साली शरद पवारांच्या पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना भाजप युतीचे बिनसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. जेमतेम अडीच वर्ष सरकार चालले. त्यानंतर फूटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला.
शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा
- शरद पवार यांची राजकीय भुमिका नेहमीच बदलती राहीली. ते एकाच गोष्टीवर ठाम असातात असे नाही. त्यामुळे त्यांच्या भुमिकेला सहज घेतले जात नाही. शरद पवारांनी २०१४ ला भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा देऊ केला होता.
- अर्थात सलग दहा ते अकरा वर्षे काॅंग्रेसोबत सत्ता भोगल्यानंतर २०१४ ला आघाडीची हार झाली. या काळात शरद पवारांनी सत्तेसाठी भाजपची साथ देण्याची जाहीर भुमिका घेतली. पण नंतर विरोधी पक्षात बसले.
- नुकत्याच नागालॅंडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत सात जागा पवारांच्या पक्षाने पटकावल्या. विरोधी पक्षात राहणार असल्याचे पवारांनी सांगितले नंतर सरकारमध्ये सामिल झाले.
- अर्थात शरद पवारांची भुमिका नेहमी भोवऱ्यासारखी राहीली आहे. याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. ती एक बाब आणि अलिकडे राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक तसेच अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या त्यातून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले असे दिसून येते.
या 4 कारणांनी चर्चा
1) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 15 दिवसांत राज्यात दोन मोठे धमाके होतील, असे वक्तव्य केले होते. यावर प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली टिपण्णी चर्चेत राहिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘एक धमाका दिल्ली आणि एक राज्यात होईल. मात्र, मी वर्तमानात जगणारी आहे. 15 दिवसानंतर काय होणार, हे मी सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.
2) अजित पवार यांनी सोमवारचा दौरा रद्द केला. त्यानंतर काही आमदारांसोबत बैठक घेतल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होता. मात्र, आज अजित पवार यांनी ट्विट करून याबाबतचे वृत्त फेटाळून लावले होते. शिवाय शरद पवारांनीही असे काही झाले नसल्याचे सांगितले.
3) अजित पवारांसोबत 40 आमदार आहेत. त्यांनी आमदारांच्या सह्याचे पत्र घेतले आहे. ते भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊ शकतात, असा दावाही काही प्रसारमाध्यांनी केला होता. मात्र, हा दावाही पत्रकार परिषदेत अजित पवारांनी फेटाळून लावला.
4) शरद पवार यांनी अदाणी – हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) गरज नसल्याचे सांगितले होते. काँग्रेसने या विधानापासून स्वतःला चार हात दूर ठेवले. पवारांची ही भूमिका सुद्धा भाजपला सहाय्य करणारी असल्याच्या चर्चा झाल्या. त्यानंतर पवारांनी जेपीसी चौकशीला विरोध नसल्याचे सांगितले.
भाजपचा प्लॅन B
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीचा निकाल कधीही येऊ शकतो. समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाविरोधा गेला. त्यांच्याकडे आमदार आहेत. त्यातले 16 अपात्र होतील. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजपसोबत जाऊन सरकार वाचवतील. मात्र, ही शक्यताही स्वतः अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळत असे झाले तरी सरकार पडणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, चर्चा सुरूच होत्यात. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत आहेत. भाजपला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार सातत्याने या आमदारांच्या संपर्कात आहेत. या आमदारांचे सहमती पत्रही घेतले असून, ते भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र, ते बाहेरून पाठिंबा देतील.
विधानसभेतले चित्र
– एकूण जागा – 288
– बहुमत आकडा 145
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
– एनडीए एकूण – 162
– भाजप – 106
– शिवसेना (शिंदेगट) – 40
– अपक्ष – 12
– इतर – 3
– प्रहार जनशक्ती – 2
महाविकास आघाडी
– मविआ एकूण – 121
– राष्ट्रवादी – 53
– काँग्रेस – 44
– ठाकरे गट – 16
– इतर – 4
– समाजवादी पक्ष – 2

