नवी मुंबई-नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे.
अमित शहांसाठी वेळ दुपारी ठेवली का?
दरम्यान, नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात धाव घेतली व रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
अमित शहा यांना दुपारी गोव्याला जायचे होते त्यामुळेच कार्यक्रम भरदुपारी ठेवला का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भरदुपारी कार्यक्रम ठेवणे ही चूक होती. कोणाच्या सूचनेवरुन या कार्यक्रमाचे नियोजन झाले, हे माहिती नाही. मात्र, अमित शहांना दुपारी जायचे असल्याने कार्यक्रमाची भरदुपारी वेळ ठेवली असेल तर हे दुर्दैवी आहे. एका चांगल्या कार्यक्रमाला यामुळे गालबोट लागले आहे.
नेमके रुग्ण किती?
अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेमके रुग्ण किती हे अद्याप समजू शकले नाही. कार्यक्रमाची वेळ भरदुपारी निवडणे, ही आयोजकांची चूक होती. चूक दुरुस्त करू, अशी चर्चा करून आता काहीच फायदा नाही. या चुकीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेला असून चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे
7 तास लोक उन्हात
दरम्यान, महाराष्ट्र भूषम पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजेचा होता. मात्र सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सचिन धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमीत शहा आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. सूत्र संयोजकांनी मोठा वेळ घेतला. परिणामी हा कार्यक्रम तब्बल 1 वाजता संपला. सेवकांना कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागले. परिणामी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 7 लाख लोक उन्हात होते. दोन दिवस खारघरचे सर्व मुख्य रस्ते बंद आहेत. शाळा व कार्यालयांना सुट्ट आहे. स्थानिक रिक्षा, परिवहन वाहतूक सर्व बंद होती. 250 टॅंकर आणि 2 हजार नळ, 69 रुग्णावाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स कार्यरत होते. प्रशासनाला वेठीस धरुन हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री शिंदे स्वत: रेवदंड्याच्या श्री समुदाय परिवारातील आहेत. त्यामुळे जंगी कार्यक्रम त्यांना करायचा होता. तसेच गृहमंत्र्यांसमोर आपण २० लाख लोक जमवू शकतो, अशी शेखी मिरवायची होती. त्यामुळे दुपारी आणि प्रशासनाला वेठीस धरून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक विभागाने या भपकेबाज कार्यक्रमाचे नियोजन करण्यास हरकत घेतली होती. त्यानंतर त्याचे नियोजन मुख्यमंत्री शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जाेशी यांच्याकडे देण्यात आली.
पनवेल महापालिका हद्दीत खारघर आहे. या उपनगरातील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क १२० एकराचे आहे. त्यावर केवळ एक वृक्ष आहे. शेजारी सेंट्रल पार्क आहे. अशा १५० एकराच्या जागेवर कार्यक्रम झाला. येथे अनेक सत्संग होतात. मात्र ते संध्याकाळी असतात.

