पुणे-
पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणाशी समरस झालेला, लोकांच्या समस्या, भावना, प्रश्न समजावून घेणारा, बोलण्यात सहजता असणारा, उदारमतवादी, संवेदनशील, सुसंस्कृत राजकारणी गिरीश बापट यांच्या निधनाने हरपला, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
बापट बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी विद्यार्थी होते. महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटनेने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले अध्यक्षस्थानी होते. बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, प्राचार्य जगदीश लांजेकर, सुधीर गाडगीळ, वि. अ. जोशी, प्रकाश भोंडे, अरुण निम्हण, बाळासाहेब गांजवे, उज्ज्वल केसकर, डॉ. प्रशांत साठे, ॲड. नरेंद्र निकम, सचिन नाईक यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली.
अनास्कर म्हणाले, ‘राजकारण जगणे काय असते याची माहिती घेण्यासाठी युवा पिढीने बापट यांचे जीवन चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. कार्यकर्ता, मैत्री, समाजकार्य म्हणजे काय याची ओळख बापट यांच्या जीवनातून होते. शहरातील विविध कट्ट्यांवर बापट यांनी सर्वपक्षीय मित्र जोडलेले होते. त्यांच्या स्मरणार्थ राजकीय लोकांचा अराजकीय कट्टा निर्माण करण्याचा विचार करावा.’

