पुणे(prab)- हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील मात्तबर बंडखोरांची भाजप-सेनेच्या पॅनेलशी हातमिळवणी केली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल विरुद्ध भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी अशी चुरशीची लढत होणार आहे. दोन्हीही पॅनेलने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून अद्यापही काही जागांवरील उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ संभ्रमात असल्याने निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे राष्ट्रवादीने १८ जागांपैकी केवळ 10 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 15 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्हीही आघाडी पक्षांना आडते, व्यापारी गटातील उमेदवार अद्यापही जाहीर करता आलेले नाहीत. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी श्रीमंत उमेदवार स्वतःला कागदोपत्री गरीब म्हणून खोटे दर्शवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवून राखीव प्रवर्गातील जागेवर हक्क दर्शवित आहेत. बनावट दाखल्यांमुळे वादातील या उमेदवारांवर हरकती व आक्षेप नोंदवले जात आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतील मतांचा भाव आधीच फुटला असून प्रबळ व मात्तबर उमेदवारांनी त्यांच्या भागातील अनेक इच्छुकांना प्रसाद देऊन अर्ज मागे घेण्यासाठी गळ घातल्याने बहुतांश इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत आहेत. 20 एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहेत.
18 जागांसाठी तब्बल 301 अर्जांपैकी 195 अर्ज वैध
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी तब्बल 301 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये 16 उमेदवारांचे 18 अर्ज बाद करण्यात आले, तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते त्यांचा एकच अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे 301 अर्जांपैकी 195 अर्ज वैध ठरले आहेत. 20 एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामधील प्रबळ व मात्तबर उमेदवार त्यांच्या भागातील अनेक इच्छुकांना प्रसाद, महाप्रसाद देऊन अर्ज मागे घेऊन पाठींबा प्राप्त करीत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे जाहीर उमेदवार-
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने 15 पैकी 10 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवार 14 एप्रिल रोजी जाहीर केली आहे. घोषित जागांमध्ये राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा देण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या 20 वर्षानंतर होणार्या निवडणुकीमुळे इच्छुकांची मोठ्याप्रमाणावर संख्या असून अजूनही 5 जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. विकास सोसायटीच्या 11 पैकी 7 जागा आणि ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4 पैकी 3 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विकास सोसायटी मतदार संघातून (सर्वसाधारण गट) शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरुळीकांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) यांचा समोवश आहे. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सचिन बाळासाहेब घुले (उंड्री), महिला प्रवर्गातून सरला बाबुराव चांदेरे (बाणेर), विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून अर्जुन पिलाजी मदने (कोलवडी) यांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटातून महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे) यांचा समावेश आहे.
भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार-
भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये सोसायटी मतदार संघ : रोहिदास उंद्रे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे, शशिकांत गायकवाड (इतर मागास प्रवर्ग). लक्ष्मण केसकर (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग). मनिषा हरपळे, सारिका हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग). सुदर्शन चौधरी, शुक्राचार्य वांजळे, रवींद्र कंद, सत्यवान गायकवाड (ग्रामपंचायत मतदार संघ) यांचा समावेश आहे. यामध्ये बंडखोरांना राष्ट्रवादीकडून संपर्क साधण्यात येत असून त्यामुळे काही उमेदवार आजारी पणाचे ढोंग करून फोन घेणे टाळाटाळ करीत आहेत. अजून 5 दिवस माघारीसाठी राहिले आहेत त्यामुळे काळजी घेण्यात येत असून वैयक्तीक रीत्या प्रचार केला जात आहे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांवर हरकती
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांमध्ये इतर मागास वर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या गटातून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांवर हरकती व आक्षेप नोंदवले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने इतर मागास वर्गीय गटातून हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य सचिन सुभाष घुले यांना ओबीसी-मराठा-कुणबी या जातप्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिल्याने त्यांच्या नावाला ओबीसी पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नियम आणि अटी दिल्या आहेत. त्यानुसार राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे विहित नमुन्यातील हमीपत्र द्वावे लागणार आहे. निवडून आल्याच्या दिनांकानंतर वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरणार आहे. तर श्रीमंत उमेदवार स्वतःला कागदोपत्री गरीब म्हणून खोटे दर्शवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवून राखीव प्रवर्गातील जागेवर हक्क दर्शवित आहेत असा आरोप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे यांचे पती नवनाथ पारगे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या मागील निवडणूक प्रतिज्ञापत्रात 8 लाख 50 हजार रुपयांचे वार्षिक करप्राप्त उत्त्पन्न असल्याचे आयकर विवरण पत्रात नमूद केलेले आहे. तसेच त्यांची मालमत्ता कोट्यावधी असल्याचे देखील नमूद केलेले असताना ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल कसे ठरतात असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष असे आहेत कि, कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. आपल्या कुटुंबात 5 एकर किंवा त्याहून अधिक शेती जमीन नसावी. आपल्या कुटुंबाकडे 1000 फीट स्क्वेअर किंवा त्यापेक्षा अधिकचा निवासी प्लॉट नसावा. उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8 अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा). या आधारावर तहसीलदार सदर प्रमाणपत्र जारी करतात.
आडते, व्यापारी गटात चुरस
व्यापारी-आडते मतदारसंघातून 2 जागा तर हमाल-मापाडी मतदारसंघातून 1 जागा अशाप्रकारचे 3 जागांसाठी इच्छुकांची चुरस आहे. या गटात मतदारांची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र 5 ते 6 हजार मतदारच संपर्कातून निष्पन्न होत आहेत अन्य मतदारांचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांना मतदारांचा थांगपत्ता लागेल त्यांना विजयाची संधी मिळणार आहे. 5 ते 6 हजार मतदारांवर बहुतांश इच्छुकांची मदार असल्याने या गटातील निवडणुकीत चुरस पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे दिग्गज आडते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आडते संघटनेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ आडते विलास भुजबळ, बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले, आडते संघटनेचे माजी उपाध्यक्ष अमोल घुले, तण आडते सौरभ कुंजीर, शिवाजी सूर्यवंशी आणि अनिरूद्ध भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे सहा इच्छुक उमेदवार वैयक्तीक रीतीने प्रचारही करत आहेत. मात्र अद्याप कोणत्याच पक्षाने पॅनेल जाहीर केले नसल्याने या उमेदवारांना स्वत:च्याच नावाने प्रचार करावा लागत आहे.
चार उमेदवारांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी
पुणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विकास सोसायटी मतदारसंघ गटातून बाजार समितीचे तत्कालीन तीन माजी सभापती आणि एका संचालकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मंजूर करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या आदेशास पणन संचालकांकडे आव्हान देण्यात आले आहे. त्याबाबत पणन संचालकांनी येत्या सोमवारी (दि.17) दुपारी एक वाजता सुनावणी ठेवली आहे. बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्याकडे तक्रारदार चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी, ता. हवेली) यांनी बाजार समितीचे माजी सभापती व निवडणुकीतील उमेदवार दिलीप काळभोर (लोणी काळभोर), प्रकाश जगताप (जगताप वस्ती, आष्टारपूर), रोहिदास उंंद्रे (मांजरी खुर्द) आणि माजी संचालक राजाराम कांचन (उरुळी कांचन) यांचे दाखल उमेदवारी अर्ज अपात्र करण्यासाठी अपील केले होते. त्यामध्ये असे नमूद केले होते की, पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचे 1 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑगस्ट 2002 या कार्य कालावधीतील कामकाजाची चौकशी करण्यासाठी पणन संचालकांनी मे. मुलाणी आणि कंपनीची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या चौकशी अहवालानुसार त्या कालावधीत 8 कोटी 66 लाख 50 हजार इतक्या रकमेचा आर्थिक तोटा झाला. त्या आर्थिक तोट्याला 21 संचालक जबाबदार होते. ही रक्कम विभागल्यास प्रत्येक संचालकानुसार 41 लाख 26 हजार 190 रुपयांच्या रकमेस ते जबाबदार होते आणि अहवाल अस्तित्वात असल्याने बाजार समिती कायद्यानुसार ते अपात्र ठरतात. वादी वारघडे व प्रतिवादींनी आपापली बाजू मांडली. त्यातील निष्कर्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हा उपनिबंधकांनी 8 मार्च 2022 रोजीच्या कायद्यान्वये संबंधित संचालकांना नोटीस काढल्या. त्यास पणनमंत्र्यांकडे अपिल क्रमांक 10/2023 दाखल केले असता त्यांनी 8 मार्च 2022 रोजीच्या नोटीसविरुध्द पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरीम स्थगिती आदेश पारित केले आहेत व या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज 5 एप्रिलच्या आदेशान्वये मंजूर केलेले आहेत.
निवडणूक खर्चाबाबत मार्गदर्शक नियमावलीचा भंग
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका मताचा ‘भाव’ प्रारंभीच फुटला असून सदरील बाजारभाव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या आधारावर फुटला असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अ वर्ग सोसायटीच्या एका मताचा भाव 5 लाख रुपयांपर्यंत गेला होता. त्या गटातील निवडणुकीत कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही पराभव झाल्याने यावेळी काही उमेदवारांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तर ज्यांना या निवडणुकीत यश मिळाले त्यांनीच आत्मविश्वासामुळे पहिल्यांदा या बाजार समितीच्या निवडणुकीत ‘भाव’ फोडला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक खर्चाबाबत मार्गदर्शक नियमावली जारी केलेली आहे मात्र सदर नियमांचा सर्रासपणे भंग केला जात आहे. इच्छुकांकडून मोठ्याप्रमाणावर प्रचारासाठी खर्च केला जात आहे. यात्रांच्या निमित्ताने जेवणावळी बैठका, मनोरंजक प्रचारही सुरु आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी च्या निमित्ताने या मोहिमा सुरु आहे. माहिती प्रचार पत्रकाचे वाटप, बॅनर व फ्लेक्स लावले जात आहेत यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. सोशल मिडिया समाज माध्यमांवरही प्रचार केला जात आहे. मात्र खर्चाचे कोणतेही नियंत्रण व देखरेख यंत्रणा प्रशासनाकडून राबविली जात नसल्याने उमेदवार निश्चिंतपणे बखळ खर्चाची उधळण करीत आहेत.
राखीव प्रवर्गातील लढती स्पष्ट
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख दोन्ही गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्याने सरळ लढती देखील स्पष्ट होत आहेत. 18 जागांमध्ये इतर मागास प्रवर्ग जागेसाठी सचिन घुले आणि शशिकांत गायकवाड यांच्यात लढत होणार आहे तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग या जागेसाठी अर्जुन पिलाजी मदने आणि लक्ष्मण केसकर यांच्यात लढत होणार आहे. आणि महिला प्रतिनिधी प्रवर्ग या 2 जागेसाठी सरला बाबुराव चांदेरे आणि मनिषा हरपळे, सारिका हरगुडे यांच्यात लढत होणार आहे.

