जबलपूर :
ज्युनिअर वर्ल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुणवंत युवा फेन्सर तेजस पाटीलने पदार्पणात महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये तलवारबाजीत पदकाचा बहुमान मिळवून दिला. औरंगाबादच्या या आंतरराष्ट्रीय खेळाडूने यंदा नव्याने खेलो इंडिया मध्ये समावेश करण्यात आलेल्या तलवारबाजी खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाला पदकाचे खाते उघडून दिले. त्याने सर्वोत्तम कामगिरी करत पुरुषांच्या फाईल प्रकारात रौप्य पदक पटकावले. त्याची सोनेरी यशाची कामगिरी थोडक्यात हुकली. त्याला या इव्हेंटच्या फायनल मध्ये बिहारच्या आकाश कुमार विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. बिहारच्या खेळाडूने १५-९ अशाप्रकारे फायनल जिंकून सुवर्णपदकाचे खाते उघडले.
महाराष्ट्र संघाच्या तेजसने दमदार खेळी करत फायनल चा पल्ला गाठला होता. नुकत्याच झालेल्या युवांच्या विश्वचषकातील कामगिरीचा मोठा अनुभव पाठीशी असल्याने त्याला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. मात्र या दरम्यान त्याचा सुवर्णपदकासाठीचा प्रयत्न काही प्रमाणात अपुरा ठरला.

सांघिक गटात सुवर्णसंधी
आंतरराष्ट्रीय फेन्सर तेजसने वैयक्तिक फाईल प्रकारात पदकाची कमाई केली. आता त्याला सांघिक गटात चॅम्पियन होण्याचे स्वप्न साकारण्याची संधी आहे. वैयक्तिक गटात हुकलेले सुवर्णपदक आता तो टीम इव्हेंट मध्ये मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
सर्वोत्तम कामगिरीमुळे पदकाचा मानकरी: कोच तांगडे
औरंगाबाद येथील युवा गुणवंत फेन्सर तेजस पाटील ची कामगिरी कौतुकास्पद ठरली.. त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र त्याची ही कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरली आहे. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी पदकाचा मानकरी होण्याचा बहुमान पटकावला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतील त्याची कामगिरी सातत्याने लक्षवेधी ठरलेली आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक स्वप्निल तांगडे यांनी पदक विजेत्या तेजस वर कौतुकाचा वर्षाव केला.
तलवारबाजीतील पदक कौतुकास्पद: चंद्रकांत कांबळे
यंदा नव्याने खेलो इंडियामध्ये तलवारबाजी या खेळ प्रकाराचा समावेश करण्यात आला. या पहिल्याच सत्रातील इव्हेंट मध्ये महाराष्ट्राच्या तेजसची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यांनी आपल्या चंदेरी यशाने महाराष्ट्राचे नाव उजळून टाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला तलवारबाजीत पदकाची हीच मोहीम कायम ठेवण्याची मोठी संधी आहे, अशा शब्दात महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे यांनी तेजसचे खास कौतुक केले.

