पुणे-आजारी मुलाचा दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील हडपसर भागातील काळेपडळमधील केतकेश्वर काॅलनीमध्ये गुरूवारी ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.अभिजीत बाबुराव जायभाय (वय- 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बाबुराव दिनकर जायभाय ( वय -५०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आरोपीची पत्नी सुनीता बाबुराव जायभाय (45) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सहा महिन्यापूर्वी अभिजीत याच्या डोक्याला मार लागल्याने, त्याला कोणतेही काम करता येत नव्हते. तसेच तो घरी बेडवरती झोपून असल्यामुळे त्याचा जगून काही एक उपयोग नाही, असे वारंवार बोलून वडिलांनी मुलास त्रास दिला होता. काहीही काम करत नसल्याचा आणि त्याच्या दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढत असल्याचा राग मनामध्ये धरून दिवाणावर झोपलेला असतानाच वडिलांनी अभिजीतचा गळा दाबून खून केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनिता जायभाय या आरोपी बाबुराव जायभाय यांच्या पत्नी आहे. अभिजित, त्याची आई आणि वडील हे तुकाईदर्शन येथे भाडेतत्त्वावर खोलीत राहण्यास होते. अभिजीतची आई धुणे भांडी तर आरोपी पिता बाबुराव हा हमालीची कामे करत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे आणि विश्वास डगळे, युनिट पाचचे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे(7045379707 )हे करत आहेत.

