पुणे-हॉटेल मधून जेवण करून घरी जात असलेल्या एका दाम्पत्याला तीन अनोळखी व्यक्तींनी थांबवून पोलीस असल्याची बतावणी करत, तपासणीच्या नावाखाली हातचलाखीने चार हजार अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयात तीन लाख 20 हजार रुपये) लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.याप्रकरणी अलखदर अब्दुल ओमर अलहखैरी (वय – 58 ,रा-मिठानगर, कोंढवा खुर्द ,पुणे )यांनी तीन अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरची घटना नऊ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारगेनगर मधील वेलकम हॉल चौकात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार हे त्यांची पत्नी बुशार असे आरबिया रेस्टॉरंट येथे रात्रीचे जेवण करण्यासाठी घटनेच्या दिवशी पायी चालत गेले होते. जेवण केल्यानंतर परत घरी जात असताना वेलकम हॉल चौक येथे ते चालत आले असता, तीन अनोळखी व्यक्ती कारमधून त्यांच्याजवळ आल्या. त्यातील एका व्यक्तीने ओळखपत्र दाखवून पोलीस असल्याचे सांगितले.तक्रारदार यांच्या जवळील हॅन्डबॅग मध्ये हशिश ( गांजा) असल्याचे सांगून तपासणी करत, तक्रारदार यांची हॅन्डबॅग घेऊन हातचलाखीने त्यातील 4 हजारअमेरिकन डॉलर (भारतीय रुपयात तीन लाख २० हजार रुपये) काढून घेऊन त्यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.त्यानंतर तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींनी विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपींवर भादवी कलम 417, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस पाटील 9975633703 पुढील तपास करत आहे.

