पुणे – कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदार संघाच्या प्रचार यंत्रणेची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.
पक्षाने या अगोदर सुद्धा मला पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात येथील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाची जबाबदारी दिलेली होती व आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सुद्धा कित्तूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. पक्षाने वेळोवेळी दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी नेहमीच प्रामाणिकपणे, मेहनतीने, चिकाटीने पार पाडत आहे व यापुढे देखील पार पाडणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत आमदार शिरोळे आज (गुरुवारी) सकाळी कित्तूरला रवाना झाले.
मी जरी पुणे शहरामध्ये नसलो तरी माझे संपूर्ण लक्ष माझ्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघावर आहेच. तुम्ही मला कॉल, मेसेज करून आपल्या समस्या सांगू शकता. तसेच माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माझी टीम सदैव आपल्या सेवेमध्ये आहेच, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पक्षाने माझ्यावर बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलेली आहे. याबद्दल मी, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री.अमित शहा, पक्षाध्यक्ष श्री.जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून कित्तूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी पत्रकात दिली आहे.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक दिनांक १० मे २०२३ रोजी होणार आहे.

