पुणे- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलला ‘आयएसओ ९००१’ मानांकन प्राप्त झाले आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते सोमवारी दि १० एप्रिल २०२३ रोजी ‘आयएसओ ९००१’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत, आयएसओचे ऑडिटर लक्ष्मीकांत साधू, राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलच्या प्रिन्सिपल रुपाली कदम, , अश्विनी ताटे तसेच शिक्षिका प्राची सर्जेराव, ज्योती शिरसाट यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता. आयएसओ ९००१ या मानांकनासाठी महापालिकेच्या ४००पेक्षा अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, शालेय स्वच्छता , शालेय गुणवत्ता, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा, वक्तृत्व,चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन, तसेच सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि शिक्षक कौशल्य प्रशिक्षण हे निकष या मानांकनासाठी होते. त्यात राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलसह राजर्षी शाहू महाराज मुलींची शाळा, इंदिरा गांधी मॉडेल स्कुल ( मुलांची ) या तीन शाळा अव्वल ठरल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये शाळा प्रवेशासाठी पालकांची नेहमीच अभूतपूर्व गर्दी होत असते. दर्जेदार शिक्षणासाठी नावारूपाला आलेल्या या आधुनिक शाळेची निर्मिती १२ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या दूरदृष्टीने झाली आणि आज एक आदर्शवत वाटचालीसाठी राजीव गांधी ई लर्निंग स्कुल दिशादर्शक ठरली आहे. इतकंच नाही तर परीक्षांच्या निकालांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखत गुणवत्तेचा जल्लोष सदैव होत आहे. याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीपर्यंत आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया आबा बागुल यांनी दिली.

