आर्ट मॅजिक संस्थेच्या वतीने बालगंधर्व येथे १६ वे चित्रकला प्रदर्शन
पुणे : नितळ चंद्रप्रकाशातील एक सुंदर रात्र… रेझिनचा वापर करून साकारलेला निळाशार समुद्र आणि किनारा…स्त्री रूपाच्या विविध छटा…गावी सुट्टीचा आनंद घेणारे चिमुकले…छत्रपती शिवरायांचे आणि गणपतीचे थ्री डी चित्र आणि कंटेम्पररी आर्ट, न्यूज पेपर आर्ट अशा विविध माध्यमातील चित्रांची जादुई दुनिया अनुभवण्याची संधी पुणेकरांना ‘ आर्ट मॅजिक ‘ या चित्रप्रदर्शनातून मिळाली.
बालगंधर्व कलादालनात आयोजित आर्ट मॅजिक या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मिलिंद फडके, अभिनेत्री गायत्री जाधव, जयंत बेगमपुरे,आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार यांच्या उपस्थितीत झाले. इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन तरुणांनी काढलेली चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
कॉफीचा वापर करून काढलेले चित्र, आडव्या उभ्या रेषांमधून साकारलेले मोराचे चित्र, समुद्र किनारी असलेल्या किल्ल्यामध्ये खेळणारी मुले… लहान मुलांनी काढलेली मोर, किंगफिशर, सिंह,चिमणी,मांजर, गरुड,कबूतर, कुत्रा या प्राण्यांच्या डोळ्यातील विविध भाव असलेली चित्रे तसेच कांतारा, कथकली, राधाकृष्ण ही चित्रे देखील लक्ष वेधून घेतात. कृष्णाच्या प्रेमात बेभान होऊन नाचणारी राधा, गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरील शांत भाव, पार्वतीचे आदिशक्ती रूप ही प्रदर्शनातील चित्रे अप्रतिम साकारली आहेत.
या प्रदर्शनात प्रामुख्याने कंटेम्पररी आर्ट, न्युज पेपर आर्ट, ३ डी आर्ट या माध्यमातील तसेच या वर्षीचे आकर्षण म्हणजे डिझाईनिंगच्या विदयार्थ्यांनी केलेले अॅक्रेलिक पेंटींग, पोस्टर पेंटींग, रेझिन, एमसिल, सॉफ्ट पेस्टल,न्यूज पेपर आर्ट, चारकोल, बॉलपेन पेंटिंग, ऑईल पेटींंग तसेच ऑईल पेस्टल, पोट्रेट चित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.
दिनांक १२ एप्रिल पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे.

