महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयात वकील आशिष गिरी यांची याचिका
शिंदे गटाकडून याचिका नाही
मुंबई-शिवसेना पक्षाचा निधी सध्या ठाकरे गटाकडे आहे. शिंदे गटाच्या हातात हा पक्षनिधी जाऊ नये, यासाठी ठाकरे गट हा निधी इतरत्र वळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षनिधीच्या वापरावर स्टे आणावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
वकील आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली असून पक्षनिधीसोबतच शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा व मालमत्ता गोठवाव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. तसेच, आपण ही याचिका शिंदे गटाकडून दाखल केलेली नाही. तर, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याचेही आशिष गिरी यांनी स्पष्ट केले.
वकील आशिष गिरी म्हणाले की, प्रसारमाध्यमांत ठाकरे गटाकडून शिवसेनेचा पक्षनिधी इतरत्र वळवण्यात येईल, असे वृत्त आहे. शिवसेनेचा हा पक्षनिधी इतरत्र जाऊ नये, यासाठी सुप्रीम कोर्टाने कोर्ट रिसिव्हर नियुक्त करुन ही मालमत्ता ताब्यात घ्यावी. हा पक्षनिधी इतरत्र जाऊ नये, एवढीच माझी भूमिका आहे. शिवसेना कुणाची?, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ही संपत्ती उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंकडे सोपवावी.
राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी या याचिकेवरही सुनावणी घ्यावी, अशी मागणी अॅड. आशिष गिरी यांनी केली आहे. आशिष गिरी म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचे सांगितल्यानंतर या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. शिवसेनेच्या मालमत्तेशी निगडीत प्रकरण याच्याशीच संबंधित असल्याने आम्ही या प्रकरणाची 24 एप्रिललाच सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. याच कारणामुळे हायकोर्टात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात याचका दाखल केल्याचे अॅड. आशिष गिरी यांनी सांगितले.

