आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे १० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित उत्सवाचा समारोप
पुणे : जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे राम हरे कृष्णा… च्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोन्याची झळाळी असलेल्या तब्बल १ कोटी रुपयांच्या भव्य देव्हा-याचे अनावरण झाले. भगवान राधा-कृष्ण, भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा तसेच हरिनाम आंदोनलाचे प्रणेते चैतन्य महाप्रभू व नित्यानंद महाप्रभू यांच्या मूर्ती या उत्कृष्ट कोरीवकाम केलेल्या देव्हा-यांमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये विराजमान झाल्या.
आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉनच्या पुणे मंदिरातर्फे श्री श्री राधा वृंदावनचंद्र मंदिराच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पाच दिवसीय उत्सवाचा समारोप इस्कॉनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात झाला. यावेळी प.पू.लोकनाथ स्वामी, चंद्रमौली स्वामी महाराज, नरसिंह आनंद प्रभु, गौरांग प्रभु, आमदार श्रीकांत भारतीय, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, इस्कॉन पुणेचे जयदेव प्रभू, रसविग्रह प्रभू, रेवतीपती प्रभू, श्वेतद्वीप प्रभू, नटवर प्रभू यांच्यासह मंदिरातील भाविक, साधुगण, ब्रह्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तांच्या देणगीतून उज्जैन येथून साकारलेल्या देव्हा-याचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध सामाजिक, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेले चरणजीतसिंग, महेश सूर्यवंशी, किशोर चव्हाण, अंकुश मेहता, किशोर येनपुरे, अशोक गुंदेचा आदींचा विशेष सन्मान देखील यावेळी करण्यात आला. तसेच मंदिर उभारणीत योगदान देणा-यांना गौरविण्यात आले.
श्रीकांत भारतीय म्हणाले, कलियुगामध्ये ईश्वरी निर्माणात अनेक संकटे आहेत. मात्र, निश्चय असेल तर सर्व काही शक्य आहे. राजकारणात चरित्र चांगले ठेवायचे असेल, तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. राजेश पांडे म्हणाले, पद, पैसा यापेक्षा देण्याची वृत्ती कशी असावी, याची शिकवण मंदिरातून मिळते. समाजात सेवाभाव निर्माण करण्याचे मोलाचे कार्य इस्कॉनकडून होत आहे.
श्री राधा-कृष्णांचे नौका विहार उत्सव, अन्नकूट महोत्सवामध्ये ४५० प्रकारचे नैवेद्य, आकर्षक रोषणाई, उत्सवात दररोज सुमारे ५० हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच अमेरिका, लंडन, बहारीन आणि जगभरातल्या अनेक मंदिरांमधून सुमारे २५ वेगवेगळे कीर्तन समूह येथे आले होते. मागील ५ दिवस रात्रंदिवस विविध प्रकारचे कीर्तन मंदिरामध्ये सुरु होते, असे संपर्क प्रमुख संजय भोसले, जर्नादन चितोडे यांनी सांगितले.
इस्कॉनमध्ये १ कोटी रुपयांच्या सोन्याची झळाळी असलेल्या भव्य देव्हा-याचे अनावरण
Date: