सातारा – अजित पवार यांचा देखील गौतम अदानींसोबत एक फोटो व्हायरल होत आहे. यावर अजित पवार म्हणाले, अदानींसोबतचाच फोटो आहे ना? कोणत्या अंडरवर्ल्ड डॉन सोबत तर फोटो नाही काढलाना? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. टाटा-बिर्ला यांनी कित्येक लोकांना रोजगार दिला. तसेच अदानींनी केले.
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार यांच्या जेपीसी भूमिकेवरुन टीका केली आहे. अलका लांबा म्हणाल्या, घाबरलेले, स्वार्थी लोक आज आपल्या वैयक्तिक हितासाठी सत्तेचे गुणगान गात आहे. देशातल्या लोकांची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत. काँग्रेसच्या या टीकेचा अजित पवारांनी समाचार घेतला.
कोणी आम्हाला काही म्हटले तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, आम्ही कोणच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाहीत. आम्हाला तेवढेच काम नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे आमचे काम आहे. असे तर रोज ‘हवसे-गवसे-नवसे’ टीका करतील, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले, समिती अदानी यांच्याबाबत चौकशी करेल. लगेचच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. मीही काल शरद पवारांची मुलाखत बघितली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

