पुणे, दि. ८ : व्याजाने पैसे देऊन आर्थिक पिळवणूक करताच राहायचे हा धंदा पुण्यात मोठ्या प्रमाणात फोफावला असून व्याजासह मुद्दल पार केल्यावरही जे पैसे मागितले जातात ते खंडणीच्या स्वरूपातच मोडतात हे माहिती असूनही पुण्यात या प्रकारच्या गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आज वारजे माळवाडी पोलिसांनी खंडणी मागणारा सावकार जेरबंद केला आहे.
व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड केल्यानंतरही व्यवसायिकाचे अपहरण करून पिस्तुलाच्या धाकाने खंडणी उकळणाऱ्या दोघा सावकारांना वारजे पोलिसांनी अटक केली. अक्षय अंकुश शिरोळे (रा. धायरी), सुरेश थोपटे (रा. दांगट पाटील नगर, शिवणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, अंकुश शिरोळे (रा. धायरी) याच्यासह तिघांच्या विरुद्ध जबरी चोरी, खंडणी, आर्म अॅक्टसह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ३५ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ पासून ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले, की फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुद्दल, व्याज आणि दंडासह परत केले. मात्र, त्यानंतरही आरोपी त्यांच्याकडे अधिक पैसे खंडणीच्या रुपाने मागत होते. त्यातूनच आरोपींनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण करून पिस्तुलाच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देत संगनमताने पैसे उकळले. तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदारांची चारचाकी पिकअपगाडी बेकायदेशिररित्या सावकारीचा व्यवसाय करून जबरदस्तीने स्वतःच्या ताब्यात ठेवली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करीत आहेत.

