पुण्यात हनुमान जयंतीला सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन
महाप्रसाद व इफ्तार पार्टीचे आयोजन
पुणे-भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, भाषा, पंथ असलेल्या आपल्या देशात सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून देणारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. याच दिवशी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पुणे हे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील अग्रगण्य ठिकाण राहिले आहे. आजही सामाजिक सलोखा जपणारे पुणे हे आदर्श शहर आहे, असे मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले.
मंगळवार पेठेतील नव जागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या वतीने युनिटी फ्रेंड सर्कल, बज्मे रहेबर यंग सर्कल आणि बज्मे तहा यंग सर्कल यांच्या सहकार्याने सामाजिक सलोखा जपणारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदु बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले तर, हिंदु बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यानिमित्त सुरु असलेल्या रोजासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडविलेल्या या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, वैष्णवी किराड, फराज खान, अकबर कुरेशी, सलीम शेख, तारिक शेख, जुनेद तांबोळी, रफिक शेख, पंकज अगरवाल, अक्षय बारसकर, राकेश यादव, कैलास सरोदे, राजेश परदेशी, बॉबी गुप्ता, नरेश अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, पुणे हे सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा वारसा असलेल्या पुण्यासारख्या शहरातच असे सामाजिक सलोख्याचे उपक्रम आयोजित होऊ शकतात. या उपक्रमाला उपस्थित राहिल्याचा विशेष आनंद आहे.
अनेकता मे एकता, यही देश की अखंडता या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक सलोख्याचे प्रतिक ठरलेल्या या हनुमान जयंतीला एकाच ठिकाणी झालेल्या महाप्रसाद व इफ्तार पार्टीमुळे सामाजिक सलोख्याचा चांगला संदेश गेल्याचे आयोजक राहुल शर्मा यांनी सांगितले.

