पुणे-
आमदार महेश लांडगे, भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या आणि मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. तरुणीने प्रेमास नकार दिल्याने तिला गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. यापूर्वीही तो याच स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकेत होता.
भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञाताने फोन करून धमक्या देऊन त्यांच्याकडे प्रत्येकी तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली होती. या सर्वांना धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली असून एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिला गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
इम्रान शेख (रा.घोरपडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख हा विवाह जुळवणी केंद्र चालवतो. त्याच्याकडे एका तरुणीचे विवाह नोंदणीसाठी प्रोफाइल आले होते. शेख याला ही तरुणी आवडली. त्याने स्वत: तरुणीला “मला तुझ्यासोबत लग्न करायचेय’ म्हणून सांगितले. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याने तरुणीची बदनामी करण्याच्या हेतूने तिचे नाव घेऊन राजकीय व्यक्तींना धमक्या दिल्या. तसेच खंडणी मागून मुलीच्या पत्त्यावर रक्कम आणून देण्याचे सांगितले. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याप्रकरणात त्याला अटक झाली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा हाच उद्योग सुरू केला. संबंधित तरुणी आपल्याला नाही म्हणाली केवळ याच कारणामुळे त्यांना राजकीय लाेकांना धमकी देणे सुरू केले.इम्रान यानेच या सर्वाना दूरध्वनी केले आहेत. तो खराडीमध्ये रक्कम घेऊन येण्यासाठी धमकावत असे. तसेच, या मुलीच्या मोटारीचा नंबर हेतुतः देत असे. खंडणीविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याची गेल्या वर्षी नोंद करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी इम्रानला तेलंगणामधून अटक केली होती. त्या गुन्ह्यात त्याची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर, त्याने पुन्हा लोकप्रतिनिधींना फोन करून खंडणीसत्र आरंभले.

