महेश इंडस्ट्रियल ग्रुप तर्फे विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कार प्रदान
पुणे : कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या क्षेत्रातील यशस्वी आणि अपयशी लोकांचाही अभ्यास केला पाहिजे. यशस्वी लोकांमुळे तुम्हाला काय करायचे ते कळेल तर अपयशी लोकांमुळे काय करायचे नाही ते कळेल. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी अभ्यास आणि चिकाटी महत्त्वाचे असते, असे मत पिंपरी चिंचवड चे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांनी व्यक्त केले.
महेश इंडस्ट्रियल ग्रुप तर्फे विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते एक्झरियल अँड कार्तिकीय ग्रुपच्या प्रमुख भगवती बलदावा, महेश इंडस्ट्रियल ग्रुपचे प्रमुख आशिष डालिया, सचिन मालपाणी, शालिनी मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते. महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या एमआयजी टीम कनेक्टचे यावेळी अनावरण करण्यात आले. तसेच एमआयजी गिअर अप मासिकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
सुनील कासट यांना भगीरथ तापडिया पुरस्कार, डॉ. राखी लड्डा यांना ओमकारनाथ मालपाणी पुरस्कार,जुगल भुतडा यांना चंपालाल सारडा पुरस्कार तर मनोज लोहिया यांना मोहनलाल कासट पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.
मनोज लोहिया म्हणाले, प्रशासन पोलीस आणि उद्योग यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे कोणत्याही उद्योगाचे नियम आणि कायदे जाणून घेतले तरच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होता येते. तुमच्यामध्ये जर धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकता.
भगवती बलदावा म्हणाल्या, बदल हा निसर्गाचा नियम आहे तोच नियम कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये लागू पडतो. काळानुसार बदलले तरच व्यवसायाची प्रगती अधिक वेगाने होत असते. आपल्या परंपरांचा आपण विसर पडू देऊ नये त्या परंपरा व्यवसायामध्येही परिवर्तित झाल्या तर जलद गतीने प्रगती होते.
सुनील कासट म्हणाले, तुमच्याकडे सध्या काय उपलब्ध आहे याबद्दल दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्यातून संधी निर्माण करणे महत्त्वाचे असते.
राखी लड्डा म्हणाल्या, पुरस्कार जरी मला मिळत असला तरी या पुरस्कारामागे माझे कुटुंबीय आणि सहकारी यांची मोठी मेहनत आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी या ठिकाणी पोहोचू शकले.
जुगल भुतडा म्हणाले, कुटुंबाने साथ दिली नाही, पैसा मिळाला नाही तरीही तुम्ही तुमच्या संस्कारांवर आणि मूल्यांवर कोणत्याही क्षेत्रांमध्ये मोठे होऊ शकतात. त्यामुळे यश मिळाले तरी आपल्या मूल्यांचा आपण विसर पडू देऊ नये.
अनुराधा इंदानी, कोहिनूर इंदानी, रेखा काबरा, रवी काबरा आरती भुतडा, शामसुंदर भुतडा, रश्मी भट्टड, निलेश भट्टड, नितीन मुंदडा, भक्ती मुंदडा, रचना भुतडा संजय भुतडा, कीर्ती लखोटिया, जितेंद्र लखोटिया, अर्चना बेहेडे, मनोज बेहेडे यांनी पुढील वर्षीसाठी महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या कार्यकारणीचा यावेळी पदभार स्वीकारला.

