पुणे – स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक यांच्यासमवेत एक व्यापक बैठक घेऊन फर्ग्युसन कॉलेज रस्ता पदपथावरील कचरा समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) दिली.
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील पदपथावर वारंवार कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून माझ्याकडे आल्या. या तक्रारींची दखल घेऊन सर्व पदपथांची पाहाणी केली. या पाहाणीत असे आढळून आले की, कचरापेट्या असूनही नागरिक, छोटे व्यावसायिक त्यांच्याकडचा कचरा पेटी बाहेर टाकतात. हे लक्षात आल्यावर नागरिक आणि छोटे व्यावसायिक यांना समक्ष भेटून कचरापेटीतच कचरा टाकण्यासाठी आवाहन केले. तसेच, पदपथावरील कचरा हा कचरापेटीतच टाकावा असे आवाहन करणारे फलक लावण्याचे ठरविले आणि स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांची बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या पाहाणी दौऱ्यात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या समवेत दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका स्वातीताई लोखंडे, सुनील पांडे, अशोक लोखंडे तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

