पुणे – पुणे शहरातील सर्व व्यवहार सकाळी सात ते संध्याकाळी सात असे पूर्ण वेळ चालू ठेवावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज (शुक्रवारी) केली.
सध्या शहरात सकाळी सात ते दुपारी चार या वेळात व्यवहार चालू ठेवले जात आहेत. ही वेळ सर्वच व्यावसायिकांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. सर्व बाजारपेठा आणि कार्यालये चार वाजताच बंद होत असल्याने हॉटेल आणि खाद्यपेय विक्रेत्यांच्या उलाढालीवर परिणाम होत आहे. दुपारी एक ते चार या वेळात शहरातील सर्वच भागात वाहनांची गर्दी होते. शिवाय, वीक एंड लॉकडाऊन असल्याने शुक्रवारी तर गर्दीचा कहर होतो. सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व व्यवहार चालू रहावेत अशी सर्व पुणेकरांचीच मागणी आहे, ती शासनाने ताबडतोब मान्य करायला हवी, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत ठामपणे सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना चाचणीविना कुठेही फिरण्याची मुभा देण्यात यावी, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी मांडली.
कोविड साथीचा आढावा घेण्यासाठी ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाले आहेत, त्यांना कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करून कुठेही फिरण्याची मुभा असावी. परराज्यात जातानाही त्यांच्याकडील लसीकरणाचे सर्टिफिकेट ग्राह्य धरावे असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले आणि दुसराही डोस घेतलेले अशांची यादी महापालिकेने तयार करून प्रसिद्ध करावी. तसेच कोरोना व्हायरसचा आर फॅक्टर रेट (रिप्राॅडक्शन रेट) चे निरिक्षण करावे आणि त्यावर उपाययोजना आखाव्यात अशीही सूचना आमदार शिरोळे यांनी केली.

