पुणे – भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधील बोलपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचाराची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपविली असून आमदार शिरोळे त्यासाठी आज (मंगळवार) बोलपूरकडे रवाना झाले.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून ११ आमदारांची निवड केली आहे त्यामध्ये आमदार शिरोळे यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराकडे वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बोलपूर मतदारसंघात डॉ.अनिर्बन गांगुली भाजपचे उमेदवार आहेत. इतिहास, राजकारण आणि संस्कृती याविषयी डॉ.गांगुली यांचा गाढा अभ्यास असून, ते डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे संचालक आहेत. डॉ.गांगुली यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली असून, प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये ते लेखन करत असतात. त्यांचा व्यासंग आणि ध्येयवाद यामुळे त्यांच्याविषयी समाजात आदर असून ते त्यांच्या मतदारसंघात विजयी होतील असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

