मुबंई(प्रतिनिधी) :विद्यार्थ्यांमधील ताण तणाव कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घडू नयेत यासाठी राज्यातल्या प्रत्येक शाळेत आता समुपदेशन कक्ष स्थापन होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या औचित्याच्या मुद्यावर लिहिलेल्या पत्रात हे उत्तर दिलं आहे. सन 2015 च्या पावसाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर 14 महिन्यांनी लिहिलेल्या उत्तरात शिक्षणमंत्र्यांनी समुपदेशन कक्षाची घोषणा केली आहे.
या प्रस्तावित समुपदेशन कक्षामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समावेशन असणार आहे.
नैराश्यातून व नकारात्मक विचारातून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार तज्ञ व समुपदेशक यांच्या मदतीने हा कक्ष काम करील, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी सहा वर्षांपूर्वी 5 एप्रिल 2010 रोजी विधान परिषदेत चर्चा घडवून आणली होती. वॉशिंग्टन स्टेट प्लॅन प्रमाणे तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रानेही विद्यार्थी आत्महत्या व ताणतणाव प्रतिबंधक सुकाणू समिती स्थापन करुन
राज्य आराखडा बनवण्याची मागणी केली होती. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी ही मागणी मान्य करुन अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही दिले हेते. त्याबद्दलची कार्यवाही मात्र फारशी होऊ शकली नाही. 2015 च्या पावसाळी अधिवेशनात कपिल पाटील यांनी हा प्रश्न पुन्हा
उपस्थित केला. 14 महिन्यांनंतर आता प्रत्येक शाळेत समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी कळवले आहे.