पुणे-पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर भाजपने आपल्या सरकारच्या कारकिर्दीत आकसाने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सवाला 125 वर्षांची दैदिप्यमान, वैभवशाली परंपरा आहे. आरे कारशेड विरोधातील आंदोलक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव कार्यकर्यांवरील ही गुन्हे मागे घेण्यात यावे.
पुण्यातील ही गणेशोत्सव मंडळे कार्यकर्ते आणि नेते घडविणारी विद्यापीठे आहेत, असा उल्लेख राजकीय व सामाजिक क्षेत्रात केला जातो. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने पुण्यात संतापाचे वातावरण आहे.
या प्रकारामुळे कार्यकर्त्यांना निष्कारण कोर्टाचे हेलपाटे घालावे लागत आहे. यामध्ये अनेक सुशिक्षित, होतकरू, तरुणांच्या करीअरचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती असल्याचे चेतन तुपे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.