पुणे : भारतात सी.ए.होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यातून तावूनसुलाखून निघालेले विद्यार्थीच सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होतात. पुणे येथील प्रतीक्षा शशिकांत मुनोत हिने भारतातील सी.ए.चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता थेट अमेरिकेची मान्यताप्राप्त सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली आहे. सी.ए.झाल्यानंतर ती सध्या पुण्यात एकाआंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते. मात्र काही तरी दैदीप्यमान करायच्या जिद्दीतून तिने नोकरीचे वेळापत्रक सांभाळून अहोरात्र कष्ट घेत सी.पी.ए.अभ्यास केला. दुबई येथील केंद्रावर अमेरिकेची सी.पी.ए.(सर्टीफाईड पब्लिक अकाउंटंट, अमेरिका) परीक्षा देऊन ती पहिल्याच प्रयत्नात ८८%गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
प्रतीक्षा मुनोत ही भारतीय जैन संघटनेचे सक्रीय पदाधिकारी शशिकांत अमृतलाल मुनोत यांची कन्या तर नगरमधीलच प्रसिध्द व्यापारी श्री.वसंतलाल हिरालाल कटारिया (दलाल के.वसंतलाल)यांची नात आहे. तिने दोन वर्षांपूर्वी सी.ए.ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. सध्या ती पुण्यातील Credit Suisse (स्विस इन्व्हेस्टमेंट बँक) या आंतरराष्ट्रीय फर्ममध्ये काम करते. तिने स्वत:च्या बुध्दीकौशल्याच्या व जिद्दीच्या बळावर ही परीक्षा देण्याचे ठरवले. अमेरिकेतील सी.पी.ए.ची परीक्षा भारताबाहेर सात केंद्रांवरच होते. प्रतीक्षाने सर्व सी.पी.ए.चा अभ्यास घरीच करून दुबई येथील केंद्रावर परीक्षा दिली. तिला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणार्या भारतातील मोजक्याच विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे.
आपल्या कामगिरीने पुणे तसेच संपूर्ण मुनोत परिवाराचे नाव उज्वल करणार्या प्रतीक्षाचे यश पुणेकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या यशाबद्दल तिचे माजी केंद्रीय मंत्री व अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी , श्री.पद्मविभूषण डॉ.के एच संचेती,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतीलालजी मुथा, विद्यमान अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पारख,कृष्णकुमार गोयल, अॅड.एस के जैन, डॉ.पराग संचेती,विजयकांतजी कोठारी ,विलासजी राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.

