पुणे-आम्ही आज आरक्षणासाठी भांडत बसलो आहोत , तर दुसरीकडे नोकरभरती न करता कंत्राटी पध्दतीने कामे करून घेतली जात आहेत . सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी असून त्याविरोधात मजबूत संघटन उभे करण्याची गरज आहे , असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले .
दलित महासंघातर्फे समता भूमीमधील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित सावधान परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील बोलत होते . या परिषदेचे अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मछिंद्र सकटे हे होते . यावेळी युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर , प्रा. श्रावण देवरे , समतावादी महिला मंचाच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे , डॉ. गेल अम्रवेट , पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट , पुणे शहर महिला अध्यक्षा लक्ष्मी पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील म्हणाले कि , जातीयता इतकी विषारी आहे कि , ती आपल्या डोक्यातून कधीच जात नाही . त्यामुळे डोक्यातून जातीला बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे .
या परिषदेचे अध्यक्ष दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मछिंद्र सकटे यांनी सांगितले कि भिमाकोरेगावचे रणसंग्राममध्ये पेशवाई विरुद्ध लढताना मातंग समाजानेही शौर्य गाजविले आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाज हा शूरवीरांच्या समाज आहे . फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचा विचार स्वीकार करून अन्यायी ब्राम्हण्यवाद उध्वस्त करण्यासाठी समतेच्या चळवळी मध्ये सक्रिय व्हावे . व त्यांनी सावधान परिषदेमागील उद्देश आणि हेतू स्पष्ट केला . ब्राम्हणी संस्कृतीने हजारो वर्ष भारतामध्ये सामाजिक ऐक्य टिकू दिले नाही , जातीवादी विषमतावादी व्यवस्थेचे ब्राम्हणवादाला जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे . त्यामुळे भारतातील ब्राम्हणवाद संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघमुक्त भारत झाला पाहिजे , अशा प्रकारचा ठराव दलित महासंघाचे आयोजित केलेल्या सावधान परिषदेमध्ये करण्यात आला .
यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले कि , जेथे अक्कल असते तिथे ज्ञान कमी असते . जो जात मानतो तो मर्यादित बुध्दिचा असतो , त्याला इतर जातीचा आंनद घेता येत नाहीं जातिमुक्त होऊन माणूस होण्याचा आनंद घेतला पाहिजे .
यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले कि , भिमा कोरेगाव दंगलीत जबाबदार असणाऱ्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यापैकी मिलिंद एकबोटेला अटक झाली परंतु , भिडेला अटक झालेली नाही . त्यामुळे एकबोटेला एक न्याय व भिडेला वेगळा न्याय कशासाठी त्यामुळे संभाजी भिडेला त्वरित अटक झालीच पाहिजे .
यावेळी प्रा. पुष्पलता सकटे यांनी सांगितले कि , भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर झालेल्या दंगलीत मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे जबाबदार असूनही न्यायालयाच्या आदेशानंतर एकबोटेला अटक झाली असली तरी मनोहर भिडे अजूनही मोकाट आहे . भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर सरकार आणि पुरोगामी नेत्यांची दुटप्पी भूमिका सर्वासमोर आली आहे . संसदेमध्ये स्त्रियाविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध केला पाहिजे .
या परिषदेमध्ये आनंद वैराट व सुहास नाईक यांनी संपादित केलेले ” भीमा कोरेगाव विजय स्तंभ व्दिशताब्दी गौरव ग्रंथाचे” प्रकाशन करण्यात आले .
या परिषदेमध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दलित महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार सहदेव खंडागळे यांनी मानले .
हि सावधान परिषद करण्यासाठी खंडू पवार , चिंतामण वैराट , बाबा भिसे , पंकज शेलार , योगेश भिसे , मंगेश पोकळे , जयवंत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले .

