इलेक्ट्रिक वाहनांमुळे ‘स्मार्ट सिटी’ला मिळेल बळ:अरुण फिरोदिया
पुणे, : “स्मार्ट सिटी संकल्पना चांगली असून, त्या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रदूषण रोखणार्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यायला हवे. तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यावरणपूरक योजना राबविल्या, तरच पुण्याला खर्या अर्थाने स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल,” असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्रा सहकार्याने माईर्स एमआरटीच्या पेट्रोलियम अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग विभागातर्फे ‘मॉडर्न अँड इनोव्हेटिव्ह टूल्स फॉर सस्टेनिबिलिटी’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. बी. डी. कुलकर्णी, विज्ञानभारतीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्त्रबुद्धे, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटीचे प्राचार्र डॉ. ललितकुमार क्षीरसागर, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. रत्नदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण फिरोदिया म्हणाले, “इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर आणि जैव-इंधनाची निर्मिती या दोन मार्गांनी दीर्घकालिन विकास साधता येईल. त्यामुळे पवज उर्जा, सौर उर्जा आणि अणुउर्जासारख्या स्त्रोतांचा आपण वापर करायला हवा. जैव इंधननिर्मितीच्या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. सोसायट्या आणि महानगरपालिकांनी पुढाकार घेऊन आपला कचरा आपल्याच हद्दीत जिरवून त्यावर प्रक्रिया करुन उर्जेची निर्मिती करावी. त्याचबरोबर या उर्जेच्या निर्मितीवरील गुंतवणुकीपेक्षा अधिक नफा अपेक्षित आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच वाजवी दरातील उर्जा आपल्याला उपलब्ध होईल.”
प्रा. डॉ. बी. डी. पाटील यांनी दीर्घकालिन विकासाठी उपयुक्त अशा प्रकल्पांविषयीची माहिती दिली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील विविध उपक्रमांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. रत्नदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दांडगे यांनी आभार मानले.