‘मेकॅनिकल’ आंतरशाखीय अभियांत्रिकीचा गाभा डॉ. सुरेंद्र पाल यांचे मत; एमआयटीसीओईमध्ये ‘अॅमेट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
पुणे : “तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आंतरशाखीय व बहुशाखीय अभियांत्रिकीची संकल्पना प्रभावी ठरत आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, आयटी, संगणक, सिव्हिल अशा आंतरशाखीय संशोधनातून नवनिर्मितीला मोठा वाव आहे. या आंतरशाखीय अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल महत्त्वाचा घटक असून, तो याचा गाभा आहे,” असे मत डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हॉन्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेंद्र पाल यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (एमआयटीसीओई) वतीने ‘अॅडव्हान्सेस इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग टेक्निक्स (अॅमेट)’ या विषयावर दोन दिवसीय दुसर्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पाल बोलत होते. याप्रसंगी डीआयएटीतील अप्लाईड फिजिक्सच्या विभागप्रमुख डॉ. संगीता काळे, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीसीओईचे संचालक डॉ. रामचंद्र पुजेरी, प्राचार्य डॉ. एन. एस. नागमोडे, परिषदेचे समन्वयक आणि डीआयएटीतील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. कुमारस्वामी, एमआयटीसीओईतील मेकॅनिक इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. बी. बर्वे, प्रा. पी. ई. चौधरी, प्रा. बर्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुरेंद्र पाल म्हणाले, “अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण आज घडीला असलेली आव्हाने पेलण्यासाठी आंतरशाखीय संशोधन होणे महत्त्वाचे आहे. मायक्रो, नॅनो आणि फ्रिक्शन पातळीवर तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे त्यात आपल्याला काम करता आले पाहिजे. आपण केलेले उत्पादन सर्वसामान्यांना सोयीचे आहे, का याचा विचार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी करायला हवा. नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचे मानवीकरण समजून घ्यावे व त्यानुसार आपल्या विकासात, संशोधनात बदल करावेत.”
डॉ. संगीता काळे म्हणल्या, “आजची गॅजेट्स, उत्पादने पाहिली, तर आपल्याला आंतरशाखीय अभियांत्रिकीचे महत्त्व लक्षात येईल. विज्ञान, अभियांत्रिकी आणि संशोधन यांचा मेळ घातल्यास अधिकाधिक उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होईल. कोणत्याही गोष्टीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स याचेच नियंत्रण असल्याचे दिसून येते. त्यामुळे आंतरशाखीय अभ्यासक्रमांची रचना होणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या अभ्यासक्रमांत अजूनही तसा समावेश नाही.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या अभिसरणाचे स्मार्टफोन हे उत्तम उदाहरण आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास होत असताना नवीन आव्हानेही आहेतच. त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना लढवायला हव्यात. या क्षेत्रात असलेल्या मोठ्या संधीचा लाभ उठवायला हवा.”
डॉ. एस. बी. बर्वे यांनी स्वागत केले. डॉ. कुमारस्वामी यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. एन. एस. नागमोडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अल्ताफ सोमाणी आणि फातिमा नगरवाला यांनी केले. प्रा. पी. ई. चौधरी यांनी आभार मानले.