उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
पुणे-पुण्यातील नामांकित एमआयटीने वीरपुत्राला शिक्षणासाठी मदतीचा हात दिला असून, पाच वर्षांसाठी ५० टक्के शुल्क माफ केले आहे. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला होता. एमआयटीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही एमआयटी चे विशेष अभिनंदन केले.
श्रीमती दिपाली मोरे यांचे पती विजय मोरे यांना २००४ साली काश्मीर मध्ये दहशतवाद्यां सोबत चकमकीत वीरमरण आले. त्यावेळीस श्रीमती दिपाली मोरे या गर्भवती होत्या. त्यामुळे मुलाच्या जन्मापूर्वीच पतीला वीरमरण आल्याने, श्रीमती दिपाली मोरे यांच्यावर मोठे संकट कोसळले. त्यातच जन्मतःच मुलाचे हृदय कमकुवत असल्याने, श्रीमती मोरे यांना विश्वजीतची काळजी घ्यावी लागत होती.
वैद्यकीय उपचारांवर प्रचंड खर्च करावा लागत होता. कालांतराने सुदैवाने श्रीमती मोरे यांच्या कष्टांना यश आले, आणि विश्वजीत हृदयाच्या आजारातून बरा झाल्याचे डॉक्टरांनी सर्व चाचण्यांअंती सांगितले. यानंतर विश्वजीतनेही गरुडझेप घेत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन यश मिळवले. तसेच एमआयटी सारख्या नामांकित संस्थेत आर्किटेक्टचे शिक्षण घेण्यासाठी पात्रता परिक्षेतही घवघवीत यश संपादन केले.
मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने श्रीमती दिपाली मोरे यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी श्रीमती दिपाली मोरे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला. नामदार पाटील यांनी एमआयटीचे डॉ. मंगेश कराड यांच्याशी संपर्क साधून, मदत करण्याची सूचना केली.
यानंतर डॉ. मंगेश कराड यांनी सर्व माहिती घेऊन, सामाजिक बांधिलकी राखून विश्वजीत मोरेच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. त्याला एमआयटीमधून उत्तम दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी पाच वर्षांचे ५० टक्के शुल्क माफ केले. त्यानिर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही एमआयटीच्या निर्णयाचे स्वागत केले. एमआयटीच्या या संवेदनशीलतेबाबत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी डॉ. मंगेश कराड यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी एमआयटीचे राहुल कराड, श्रीमती दिपाली मोरे, विश्वजीत मोरे हे देखील उपस्थित होते. विश्वजीतच्या शैक्षणिक प्रगतीत कोणतीही अडचण आल्यास, त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी मोरे कुटुंबियांना दिली. तसेच मुलाच्या शिक्षणासाठीच्या मदतीबद्दल श्रीमती मोरे यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.