पुणे, दि.१२ ऑक्टोबर २०१७ -“दीपावलीचे लक्ष्मीपूजन यावर्षी दि.१९ ऑक्टोबर, गुरुवारी सायं. प्रदोषकाळी ६.११ ते रात्री ८.४० या अडीच तासात करावे. निदान ८.४० पूर्वी पूजा प्रारंभ होईल असे पहावे. ” असे आवाहन पं.वसन्तराव गाडगीळ यांनी केले आहे.
“लक्ष्मीपूजन हा केवळ व्यापारीपेढ्या, दुकानदार यांनीच करायचा कार्यक्रम नसून अवदसा (दारिद्र्य, गरीबीचा) नाश व्हावा यासाठी ‘अलक्ष्मीं नाशय्।’ अशी प्रार्थना आणि केरसुणीच्या पूजनाने अवदसा – गरीबी झटकूनच लक्ष्मी या संपदेचे, संपन्नतेचे पूजन हा लक्ष्मीपूजनाचा उद्देश असतो. ” असे सांगून ते पुढे म्हणतात
केवळ व्यापार धंद्यातून नव्हे घरी गृहस्थाश्रम धर्मात सुध्दा रोजच्या रोज हिशोब वहीत लिहून व्यावहारिक स्वच्छता-शुचिता हा एक आवश्यक कर्तव्य धर्मच आहे. या हिशोबवही पुस्तकावर ॐकाराचे मंगल स्वस्तिकासह शुभ-लाभ असे लिहून यांचे पूजन-वहीपूजन हेच सरस्वतीपूजन दीपावलीचा भाग म्हणून पाडवा-बलिप्रतिपदा २१-१०-२०१७, शनिवारी पहाटे अभ्यंगस्नानानंतर सूर्योदयापूर्वीच पहाटे करायचे असते. पाडवा पहाटे अभ्यंग स्नानानंतर दिनचर्येचा हा पहिला कार्यक्रम कोणीहि चुकवू नये” असेहि त्यांनी सांगितले आहे.