विश्व शांती केंद्र (आळंदी), एमआयटी डब्ल्युपीयू व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार संपन्न
पुणे: “महात्मा गांधी म्हणावयाचे की, आपण सर्वच जण आपापल्या कुटुंबासाठी धडपडत असतो. आपल्या प्रत्येक माणसाचे भले व्हावे असे आपणांस वाटते. खरेतर हाच हिताचा विचार समाजासाठी करण्याची गरज आहे.” असे उद्गार पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी काढले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी डब्ल्युपीयू व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने 14 ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळा एमआयटीच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड उपस्थित होते.
यावेळी सिंबायोसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, जम्मू- कश्मीर येथे कार्यरत असणारे आयएएस अधिकारी सागर डोईफोडे, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, पं. वसंत गाडगीळ, श्रीवर्धन वसंत गाडगीळ हे उपस्थित होते.
योगी ज्ञाननाथजी रानडे महाराज, रामकृष्ण गोविंद देशपांडे, प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्रति साने गुरुजी प्राचार्य रामचंद्र नारायण पांडे, विज्ञानतपस्वी डॉ. गोविंद स्वरूप, नाट्यकला तपस्वी महर्षि श्रीकांत मोघे, वैद्यकसेवा तपस्वी शरद हरि भिडे, गोसेवा महर्षि पृथ्वीराज चुनीलाल बोथरा, नादब्रह्मतपस्वी प्रभाकर जोग, निर्मलादेवी पुरंदरे, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, वारकरी तपस्वी महादेव सावळा पाटील, योगसाधना तपस्वी अॅडव्होकेट अनंत शाहूराव कुकडे या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचा सत्कार केला गेला. तसेच हास्य व्यंगचित्रकार पुण्यश्लोक मंगेश तेंडुलकर यांनाही मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला.
मुक्ता टिळक म्हणाल्या, “आज आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच तरुणाईस आज स्वत:च्या आई-वडिलांकडे पाहण्याइतपतही वेळ नाही. चंगळवादाच्या आहारी जाणार्या या पिढीने खरेतर ऋषीतुल्य असणार्या या व्यक्तींचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावयास हवा. जर या स्वरूपाचे कार्यक्रम सर्वत्र राबविले गेले, तर नक्कीच चंगळवादाला आळा बसेल.”
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली, अगदी त्याचप्रमाणे आज ही ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांच्या सत्काराची परंपरा गेली 42 वर्षे सुरू आहे. एमआयटीच्या प्रांगणात हा कार्यक्रम सुरू केल्यामूळे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वांबद्दलचा युवावर्गातील आदर अजूनच वाढेल.”
सागर डोईफोडे म्हणाले, “ आपली संस्कृती ही सगळ्या संस्कृतींची सांगड घालणारी आहे. कश्मीरमध्ये काम करत असताना देखील आपल्या वेद पुराणाचा संदर्भ लागतो. आज तिथली स्थिती पाहता आपण पुढाकार घेऊन पावले उचलणे आवश्यक आहे. ज्यामूळे सकारात्मक गोष्टी एकात्मतेच्या दृष्टीने आपण पुढे जाणार नाही. आपले त्यांच्याबद्दल असणारे प्रेम, आपुलकी, अत्मियता त्यांच्या पर्यंत पोचणे गरजेचे आहे. ज्यामूळे आपली राष्ट्रीय एकात्मता वाढेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे आगळे-वेगळे स्वरूप समोर आणणारा हा ऋषीपंचमीचा उत्सव आहे. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस़्कृतीचे दर्शन जर जगाला घडवायचे असेल तर श्रीराम नामासोबतच या स्वरूपाचे उत्सव साजरे होणे गरजेचे आहे.”
प्रा. राहुल वि. कराड म्हणाले, “ अशा स्वरुपाचा कार्यक्रम खरेतर संपूर्ण देशात होणे गरजेचे आहे. सर्व महापालिकांच्या महपौरांनी पुढाकार घेऊन असे कार्यक्रम त्या-त्या ठिकाणी घडवून आणावेत. जेणे करून तिथल्या ऋषीतुल्यांचे ज्ञान, त्यांची महती तिथल्या तरुणाईला होईल. ”
पं. वसंत गाडगीळ यांनी संस्कृतमध्ये प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. प्राचार्य डॉ. एल.के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

