पुणे, दि. 1 ऑगस्ट : “आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतो. परंतू फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन पदवी संपादन करतो. एवढ्यावरच न थांबता नवनिर्मिती करणे गरजेचे आहे. पारंपारिक ज्ञानाला नवनिर्मितीची जोड दिल्यास जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो,” असे मत भारतीय विद्यापीठ संघाचे महासचिव डॉ. फुरकन कमार यांनी व्यक्त केले. राजबाग, लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
साऊथ आशियाच्या ग्लोबल सप्लाय चेनच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक श्री. कंदी सिताराम व इकोले सॉलिटिअरचे संस्थापक संचालक श्री. मिनोचर पटेल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक सहविश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनिल राय, डॉ. सुनिल कराड, प्रा. सौ. सुनिता मंगेश कराड, प्रा.सौ.स्वाती चाटे, सौ. ज्योति ढाकणे व एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रावंदे हे उपस्थित होते.
डॉ. फुरकन कमार म्हणाले, “पूर्वीच्या काळी उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण फार कमी होते. परंतू आजची परिस्थिती पाहता मुलांच्याबरोबर मुली उच्चशिक्षण घेत आहेत ही गोष्ट समाजाच्या व देशाच्या हिताची आहे. पण आज संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण देणार्या संस्था मोठ्याप्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे आठशेच्या आसपास विद्यापीठेही आहेत. यामध्ये 40 हजारांहून अधिक महाविद्यालये असून या महाविद्यालयाच्या पटसंख्येचा विचार केला असता, याचे मूळ शोधत असताना असे लक्षात येते की, काही महाविद्यालयांत गुणवत्ता नाही व काहींकडे अनुभविक प्राध्यापक नाहीत. व काही महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे इंजिनिअरिंग व मेडिकलमधील जागा रिकाम्या आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालयेच टिकू शकतील.”
कंदी सिताराम म्हणाले, “आपण चार वर्षे या महाविद्यालयात शिक्षण घेणार आहात. त्यामुळे आपण पुस्तकी ज्ञान तर मिळवाच, परंतू त्याबरोबर खेळ, सामाजिक बांधिलकी या ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आज तंत्रज्ञानाची झापाट्याने वाढ होत आहे. ते तंत्रज्ञानही आत्मसात करून आपले ज्ञान वाढविण्याची आवश्यकता आहे. नव नविन कल्पनेचा वापर करून छोटे छोटे प्रकल्प तयार करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपला सर्वांगीण विकास होईल. उद्योगधंद्याला लागणारे कुशल मनुष्यबळ एमआयटी एडीटी या विद्यापीठातून निर्माण होणार आहे. ते शिक्षणसंस्था आणि उद्योगधंद्यांमधील दरी भरून काढण्याचे कामकरीत आहे.”
मिनोचर पटेल म्हणाले, “भारत हा जगात सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा वेळी आपण उच्च शिक्षण घेत आहात. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला विकसित करा. त्याचबरोबर बौध्दिक कौशल्य, कल्पना, परिश्रम व गुणवत्ता हे गुण आत्मसात करा. बुध्यांक, भावनांक, नितीमत्तांक व आत्मांक या चार बाबी आपल्या जीवनात उतरविण्याची आवश्यकता आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“चारित्र्य, शिस्त आणि स्वच्छता या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थी घडविण्याचे काम या विद्यापीठामार्फत केले जात आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञान आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच थोर महापुरूष, संत व तत्त्वज्ञान्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा.”
प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तयार केला असून, उद्योगधंद्याला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
डॉ.सुनिल राय यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.स्वप्निल शिरसाट व प्रा.पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. किशोर रवंदे यांनी आभार मानले.
विश्वशांती प्रार्थनेने कार्मक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

