पुणे, दि. १३ : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ जून २०१७ ते शनिवार, दि. १७ जून २०१७ या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थाना निमित्ताने युनेस्को अध्यासना अंतर्गत लोकशिक्षणपर व्याख्यान/प्रवचन/कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात माईर्स एमआयटी, पुणेचे ह.भ.प. श्री. शालीकराम महाराज खंदारे, ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड गुरूजी, परभणी येथील ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सकाळच्या सत्रात कीर्तने होणार आहेत. तर सायंकाळी पुणे येथील जुन्नरचे ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री, प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या भगवतीताई दांडेकर आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची कीर्तने होणार आहेत.
दुपारच्या सत्रात ह.भ.प. अमोल मोरे व सहकारी यांचा संतवाणी हा भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम, ह.भ.प. भरत महाराज वाघ आणि सहकारी यांचा सांप्रदायिक भजन व गवळणीचा कार्यक्रम आणि ऋषिकेश बडवे, संजीव मेहदंळे व संपदा थिटे व सहाकार्यांचा राजा परांजपे प्रॉडक्शन निर्मित अभंगरंग हा भक्तीसंगीताचा सुरेल कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात आळंदी देवाची येथील ह.भ.प. श्री आसाराम महाराज बडे, आळंदी देवाची येथील प्रज्ञाचक्षु ह.भ.प गणपत महाराज जगताप व ह.भ.प डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प. बबनराव पाचपुते यांची प्रवचने होणार आहेत.
रोज रात्री भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार असून, यामध्ये पं.जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पं.रमेश रावेतकर यांचा भक्तिरंग हा सुरेल कार्यक्रम होईल. चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी यांचा भक्तीभावतरंग हा भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम होईल. तसेच, श्रीमती गोदावरीताई मुंडे, श्री रमेशबुवा शेनगांवकर, श्री काशीरामबुवा इडोलीकर व दिगंबरबुवा कुटे यांचा सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम होईल.
काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ हे करतील.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय भटकर, विश्व शांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी, पुणेचे अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील का. कराड, आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे हे या सर्व कार्यक्रमाचे संयोजक आहेत. महेश महाराज नलावडे व शालिकराम खंदारे व सुदाम महाराज पानेगांवकर हे या कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

